शिरूर : नायब तहसीलदारांना पाचंगे यांनी दिला पायजमा | पुढारी

शिरूर : नायब तहसीलदारांना पाचंगे यांनी दिला पायजमा

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : महावितरणाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी बुधवार (दि. 8) पासून शिरूर तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले. हे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरू असून, गुरुवारी (दि. 9) पाचंगे यानी आपला पायजमा काढून नायब तहसीलदार शाम पानेगावकर यांना दिला.  दरम्यान दुसर्‍या दिवशी विविध संघटनांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला.

यामध्ये जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीचा पाठिंबा सरपंच स्वाती घावटे, उपसरपंच अनिल लोंढे यांनी पत्र देऊन जाहीर केला. या वेळी माजी सरपंच अरुण घावटे, विठ्ठल घावटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष गणेश जामदार, भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश-अहमदनगरचे कार्याध्यक्ष योगेश कुलथे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, शहर भाजप सरचिटणीस विजय नर्के, नवनाथ भुजबळ, नवनाथ जाधव, शरद रासकर, निलेश नवले, तालुका संघटन सरचिटणीस माऊली बहिरट आदी उपस्थित होते .

आंदोलनाचा भाग म्हणून पाचंगे यांनी अंगावरील शर्ट काढून बनियनवर आंदोलन सुरू केले, आंदोलनाच्या प्रत्येक दिवशी अंगावरील एक-एक कपडा काढण्याचा इशारादेखील त्यांनी दिला होता. दरम्यान महावितरणचे केडगाव येथील अतिरिक्त कार्यकारी किशोर शिंदे, शिक्रापूरचे उपकार्यकारी अभियंता शिक्रापूर नितीन महाजन, उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यानी पाचंगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण व आंदोलन थांबवण्याची विनंती केली. महावितरण कंपनीच्या वतीने लेखी पत्र देत असल्याचे सांगितले; मात्र त्यात पांचगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यासंदर्भात स्पष्ट उल्लेख नसल्याने ही चर्चा फिसकटली व पाचंगे हे आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. अखेर त्यांनी आपला पायजमा काढून नायब तहसीलदार पानेगावकर यांना दिला.

Back to top button