पिरंगुट : ग्रामीण भागातही महिलांना व्यवसायाच्या संधी : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

पिरंगुट : ग्रामीण भागातही महिलांना व्यवसायाच्या संधी : खासदार सुप्रिया सुळे

पिरंगुट; पुढारी वृत्तसेवा : पुण्याचा पश्चिम ग्रामीण भागही सध्या झपाट्याने बदलत असून, स्थानिक महिलांना व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. भुकूम ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रामथडी जत्रेचे आयोजन केले होते. तिच्या उद्घाटनप्रसंगी सुळे बोलत होत्या. संसारामध्ये आर्थिक हातभार लावून प्रगती करावी, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या वेळी व्यक्त केले.

परिसरातील महिलांना व्यवसायाच्या संधी निर्माण व्हाव्या या हेतूने या जत्रेचे आयोजन केल्याचे सरपंच गौरी भरतवंश यांनी सांगितले. जत्रेमध्ये परिसरातील अनेक महिला बचतगट, छोट्या-मोठ्या महिला उद्योजकांनी व्यवसाय थाटले होते, असे उपसरपंच अंकुश खाटपे यांनी सांगितले. महिलांनी घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला उद्योग आदींचे स्टॉल उभारले होते.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्रा.सविता दगडे, नगर येथील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू करंजावणे, भानुदास पानसरे, सचिन आंग्रे, सचिन हगवणे, नीलेश ननावरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष शरद पवार यांनी केले.

Back to top button