नवी सांगवी : जलतरण तलावमध्ये गर्दी; 64 पासधारक दिवसभरात पोहण्यास येतात

संतोष महामुनी
नवी सांगवी : सध्या कडक उन्हाळ्याच्या झळा सुरू आहेत. यातून काहीसा दिलासा मिळतो तो पोहण्यातून. त्यामुळे आबालवृद्धांचा उन्हाळ्यात जलतरण तलावाकडे दिवसेंदिवस ओढा वाढत चालल्याचे चित्र दुपारी पहावयास मिळाले. पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या कै. काळूराम जगताप जलतरण तलावात पोहण्यासाठी आबालवृद्धांची तुडुंब गर्दी जमली होती. पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकातील कै. काळूराम जगताप जलतरण तलावात पोहण्यासाठी दिवसेंदिवस मुलांची गर्दी वाढत चालली आहे.
सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी सकाळी व दुपारच्या सुमारास गर्दी होताना दिसून येते. उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीराची लाहीलाही होत असल्याने विविध भागातील व परिसरातील नागरिकांची पावले पोहण्यासाठी जलतरण तलावाकडे वळत आहेत. भर दुपारी येथील जलतरण तलाव परिसरात ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केलेल्या नागरिकांची झुंबड पहावयास मिळाली. दिवसभरात एकूण साडे चारशेहून अधिक नागरिक पोहण्यासाठी गर्दी करून आले असल्याची माहिती याप्रसंगी मिळाली.
महापालिकेचे शहराच्या विविध भागांतील 13 जलतरण तलावांपैकी केवळ सहा जलतरण तलाव सुरू असून, सात तलाव बंद आहेत. फेब्रुवारी महिना संपला असून, तापमानातील तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सकाळी दहानंतर तर शरीराची अक्षरशः लाही लाही होत आहे. मार्चमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात येथील महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये पोहायला येणार्यांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते.
रविवारी बॅचनुसार
ऑनलाईन बुकिंग करून आलेले नागरिक पुढीलप्रमाणे
सकाळी 7 ते 8 एकूण 81 नागरिक
सकाळी 8 ते 9 एकूण 83 नागरिक
सकाळी 9 ते 10 एकूण 14 नागरिक
दुपारी 2 ते 3 एकूण 17 नागरिक
दुपारी 3 ते 4 एकूण 83 नागरिक
दुपारी 4 ते 5 एकूण 89 नागरिक
दुपारी 5 ते 6 एकूण 60 नागरिक
- महापालिकेच्या जलतरण तलावावर ऑनलाईन पद्धतीने एक तास पोहण्यासाठी दहा रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच वयोगटानुसार तिमाहीसाठी 200 रुपये, सहा माहीसाठी 350, तर वार्षिक 500 रुपयांपर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे येथे मोठी गर्दी होत आहे. तलावावर एकावेळी 80 जणांना एका बॅचला ऑनलाईन पद्धतीचे नियोजन केलेले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जण वेळेआधी दहा मिनिटे येथे येऊन प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
- महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळे गुरव, नेहरूनगर, चर्होली वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी आणि आकुर्डी या भागांत 13 जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील चिंचवड, केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर आणि पिंपळेगुरव हे जलतरण तलाव सुरू आहेत. तर, भोसरी, मोहननगर, सांगवी, थेरगाव, आकुर्डी या भागातील जलतरण तलाव बंद आहेत.