पिंपरी : आधारकार्डची प्रक्रिया आता झाली सोपी | पुढारी

पिंपरी : आधारकार्डची प्रक्रिया आता झाली सोपी

मिलिंद शुक्ल

पिंपरी :  नवीन आधार कार्ड काढायचे असल्यास किंवा आधारवरील पत्ता आता अपडेट करावयाचा असल्यास तो तुम्हाला जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन करता येणार आहे. ती प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे. आधार कार्डसाठी नवीन नोंदणी करावयाची असल्यास शहरात तुम्ही रहात असलेल्या भागातील टपाल कार्यालयात जाऊन आपल्या नावाचा आणि पत्याचा पुरावा असलेले कागदपत्रं घेऊन जावे. टपाल कार्यालयातील आधार कार्ड नोंदणी कक्षात तुम्हाला तुम्ही नावाचा आणि पत्याचा पुरावा असलेले कागदपत्रं दाखवून अपॉइटमेंटचे टोकन आणि अर्ज मिळेल.

टोकनवर जी तारीख आणि वेळ दिली असेल, त्या वेळी आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन जावी. त्यात पॅनकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, गेल्या तीन महिन्यांचे वीज-पाणी-दूरध्वनी बिल यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे तुमच्याकडे नसतील, तर गॅझेटेड ऑफिसर किंवा तहसीलदारांनी त्यांच्या लेटरहेडवर तुमचा फोटो लावून दिलेले प्रमाणपत्र ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच आधार कार्ड दुरुस्ती करावयाची असल्यास वरील पद्धतीनेच टोकन आणि दुरुस्ती अर्ज आधार कार्ड केंद्रातून घ्यावा. अर्जावर काय बदल करावयाचा आहे. त्याचा पुरावा असलेले कागदपत्र अर्ज जमा करावयाच्या वेळी केंद्रावर द्यावे. म्हणजे पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल.

अर्ज असा भराल
आधार दुरुस्ती अर्ज : अर्जात नाव भरताना मिस्टर, मिसेस, श्री, सौ. किंवा डॉ. असे टाकू नये. जे नाव टाकले असेल, त्यासाठी पासपोर्टची स्कॅन केलेली प्रत, पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आदी कागदपत्रे अपलोड करू शकतात किंवा केंद्रावरील अधिकार्याला दाखवून भरून घेऊ शकतात. तुम्ही युआयडी-आय या वेबसाइटवर पुरावा म्हणून सादर करता येणारी वेगवेगळी कागदपत्रे तपासू शकता.
वय आणि जन्मतारीख : तुम्हाला तुमची जन्मतारीख डीडी/एमएम/वायवायवायवाय या फॉरमॅटमध्ये टाकावी लागेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांची जन्मतारीख माहीत नसल्यास, तुम्ही अंदाजे वय वर्षांमध्ये टाकू शकता.

पत्ता : तुम्ही आधार नोंदणी केंद्राला भेट दिल्यास, मूळ पत्ता पुरावा सोबत ठेवा. तुमचा पत्ता टाकताना खूप दक्ष राहा. कारण तिथेच तुम्हाला तुमचे आधार कार्ड मिळेल. तुम्हाला तुमच्या अ‍ॅड्रेस टॅबमध्ये तुमचे पालक, पालक किंवा जोडीदाराचे नाव समाविष्ट करायचे असल्यास, तेथील पर्याय निवडा. नाते : आधार कार्ड अर्जदाराचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असल्यास, वडील, आई किंवा पालक यांचे नाव आणि आधार क्रमांक सक्तीचा आहे.

कागदपत्रे : तुमचा फॉर्म सबमिट करताना तुम्ही कोणती कागदपत्रे प्रदान कराल हे नमूद करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्मतारीख आणि नातेसंबंधाचा पुरावा असू शकतात. तुमची ओळख किंवा पत्ता पडताळणी कुटुंब प्रमुख किंवा परिचयकर्त्यावर आधारित असल्यास, तुम्ही ईआयडी किंवा परिचय टॅबअंतर्गत तुमचा आधार किंवा ईआयडी
क्रमांक द्यावा.

आठ केंद्रांवर चालते काम
सध्या पिंपरी, पिंपरी पीएफ, चिंचवड, चिंचवड उपविभाग, भोसरीगाव, आकुर्डी, प्राधिकरण आणि हिंजवडी अशा आठ टपाल कार्यालयात केंद्र सुरू आहेत. यात साधारणतः पिंपरी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर इतर कार्यालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्ड नोंदणी आणि अपडेटचे काम सुरू असते. एका केंद्रावर साधारण 25 टोकन असे आठ केंद्रांवर दररोज 200 टोकनप्रमाणे काम चालते, असे चिंचवड मुख्यालयाचे जनसंपर्क डाक निरीक्षक के. एस. पारखी यांनी सांगितले.

1 ते 5 वर्षाच्या लहान मुलांचेही आधार कार्ड काढता येते. शहरातील कुठल्याही टपाल वितरण कार्यालयातील पोस्टमनमार्फत हे आधारकार्ड काढता येते. यासाठी त्या लहान मुलाचा जन्मतारखेचा दाखला आणि आई, वडिलांपैकी एकजण बरोबर असावा. पोस्टमनशी संपर्क साधल्यास पोस्टमन आपल्या दारी येऊन बायोमॅट्रिक करून कार्ड केले जाते. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

नितीन बने, जनसंपर्क डाक निरीक्षक, पिंपरी मुख्यालय.

Back to top button