पिंपरी : महापालिकेतर्फे मिळकतकीपट्टी दरवाढ? लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवटीत हालचाली | पुढारी

पिंपरी : महापालिकेतर्फे मिळकतकीपट्टी दरवाढ? लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवटीत हालचाली

मिलिंद कांबळे

पिंपरी : कोरोना महामारी व इतर कारणांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य आर्थिक स्त्रोत मर्यादित झाले आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधण्याबरोबरच मिळकतकर व पाणीपट्टी दरात वाढ करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. नगरसेवक व पदाधिकारी नसल्याने प्रशासकीय राजवटीत आयुक्तांकडून हा कडू निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.
कोरोना मुळे संपूर्ण अर्थचक्र ठप्प झाले होते. वर्ष, दोन वर्षांने अर्थचक्र पूर्वपदावर आले. मात्र, महापालिकेचे उत्पन्न मर्यादित झाले आहे.

त्यामुळे पालिकेने नव्या मोठ्या प्रकल्पांवरील खर्चासाठी हात आखडता घेतला आहे. जीएसटी, बांधकाम परवानगी, मिळकतकर, पाणीपट्टी, अग्निशमन परवाना हे पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. त्या उत्पन्नावर पालिकेचा गाडा हाकला जात आहे.
शहरातील अनेक भागांत गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत. त्यातून पालिकेस मोठा महसूल मिळत असून, राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरात बांधकाम परवानगीचे शुल्क आकारले जात आहे.

मिळकतकर व पाणीपट्टी दरवाढीबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांसोबत आयुक्त शेखर सिंह यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. दरवाढ करणे गरजेचे असल्याचे संबंधित विभागाच्या प्रमुखांनी पटवून दिले आहे. त्यानुसार, सर्वसाधारण सभेत मिळकतकर व पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावाला आयुक्तांकडून मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. ही दरवाढ लागू झाल्यास पालिकेच्या उत्पन्नात 500 कोटींपेक्षा अधिकांचा महसूल दरवर्षी जमा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाणीपट्टीतून पालिका तिजोरीत 100 कोटींची भर
तसेच, सन 2017 नंतर म्हणजे सहा वर्षांनंतर पाणीपट्टीत वाढ करण्यात येत आहे. शहर झपाट्याने वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढली असून, 510 ते 520 एमएलडी पाणी कमी पडत आहेत. नागरिक पिण्याचा पाण्याचा बेसुमार व कसाही वापर करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. सध्या घरगुती नळजोडसाठी 1 हजार लिटरसाठी पाण्यासाठी प्रति घर प्रतिमहिना 4 रुपये 63 पैसे असा दर आहे. तर, वाणिज्य नळजोडसाठी एक हजार लिटर पाण्यासाठी 57 रुपये 88 पैसे असा दर आहे. सध्या शहरात एकूण 1 लाख 71 हजार 96 अधिकृत नळजोड आहेत. त्यातून पालिकेस सुमारे 60 कोटींचे उत्पन्न मिळते. दरवाढ केल्यास उत्पन्न दुप्पटीने वाढून 100 कोटींच्या पुढे जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षांत मिळकतकरात वाढ नाही
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 5 लाख 95 हजार मिळकती आहेत. पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतीचे दर खूपच कमी आहे. गेल्या दहा वर्षांपासून जुन्याच दर असल्याने पालिकेचे दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

पालिकेचा महसूल दुप्पटीने वाढणार
शहरातील मिळकतकराचे दर हे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या काळात सन 2013-14 मध्ये सुमारे 5 टक्क्यांने वाढविण्यात आले. त्यानंतर दोन ते तीन वेळा मिळकतकर दरवाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. तो फेटाळण्यात आला. त्यामुळे गेल्या 10 वर्षांत मिळकतकरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे शहरातील टोलेजंग इमारती व सदनिका, बंगले व घरांचे दर एकसमान आणि कमी असल्याचे चित्र आहे. अनेक वर्षे दरवाढ न केल्याने आणि उत्पन्न वाढीसाठी मिळकतकरात वाढ करण्याचा हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. शहरात एकूण 6 लाख मिळकतींची नोंद पालिकेकडे आहे. दरवाढ झाल्यास पालिकेचा महसूल दुप्पटीने वाढून पालिका तिजोरीत भर पडणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

मागील वर्षीचे महापालिकेचे उत्पन्न
जीएसटी- 1 हजार 900 कोटी
बांधकाम परवानगी- 1 हजार 20 कोटी
मिळकतकर-633 कोटी
पाणीपट्टी-55 कोटी
अग्निशमन विभाग-205 कोटी
प्राधिकरण विशेष कक्ष-165 कोटी 75 लाख
भूमि आणि जिंदगी विभाग-2 कोटी
आकाशचिन्ह विभाग-12 कोटी 58 लाख

1 लाख 71 हजार 96 अधिकृत नळजोड
निवासी-1 लाख 44 हजार 144
हाउसिंग सोसायटी-19 हजार 688
वाणिज्य-6 हजार 772
शैक्षणिक, शासकीय व निम्नशासकीय-240
महापालिका इमारती-107
धार्मिक संस्था-145
अनधिकृत नळजोड-सुमारे 75 हजार
मिळणारे उत्पन्न 60 कोटी
दररोजचा अर्ध्या शहराला पाणीपुरवठा
520 एमएलडी

Back to top button