पुणे : जलपर्णीच्या कामाबाबत आयुक्तही अनभिज्ञ; माहिती न दिल्याने अधीक्षक अभियंत्याला नोटीस | पुढारी

पुणे : जलपर्णीच्या कामाबाबत आयुक्तही अनभिज्ञ; माहिती न दिल्याने अधीक्षक अभियंत्याला नोटीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नदी, तलावांमधील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना जलपर्णी किती काढली याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनाच सादर करण्यास मलःनिसारण विभागाच्या अधिकार्‍यांकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अखेर या विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना नोटीस बजावून माहिती मागविण्यात आली. तरीही अद्याप नोटीसला उत्तर देण्यात आलेले नाही आणि दुसरीकडे या कामाच्या निविदा 30 मार्च रोजी संपत असताना अजून तब्बल 40 टक्के काम शिल्लक असल्याचे समोर आले आहे.

पुणे शहरातून वाहणार्‍या मुळा-मुठा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढते. तसे शहरातील कात्रज तलाव, पाषाण तलाव, जांभूळवाडी तलावातदेखील जलपर्णी आहे. नदीतील जलपर्णी काढण्यासाठी 50 लाख, तर तलावातील जलपर्णी काढण्यासाठी 50 अशी एक कोटी रुपयांची निविदा दरवर्षी काढली जाते. जलपर्णी न काढल्याने पर्यावरणास धोका निर्माण होतोच पण नदी, तलावाच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागते. डासांचा प्रचंड त्रास होतो.

महापालिका आयुक्तांकडून दर सोमवारी मलःनिसारण विभागाकडून देखभाल-दुरुस्ती आणि जलपर्णीच्या कामाचा आढावा घेतला जातो. जलपर्णी काढण्यासाठी तरतूद उपलब्ध असूनदेखील पाषाण व जांभूळवाडी तलावात, नदीपात्रात जलपर्णी असल्याचेही दिसून आले. त्यामुळे जलपर्णी किती काढली याचा अहवाल आयुक्तांनी या विभागाचे प्रमुख अधीक्षक अभियंता संतोष तांदळे यांच्याकडे मागितला. हा अहवाल न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी तांदळे यांना नोटीस बजावून दोन दिवसांत उत्तर द्यावे अन्यथा महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार कारवाई केली जाईल अशी तंबी दिली. तरीही तांदळे यांनी नोटीसला उत्तर दिलेले नाही. डॉ. खेमनार म्हणाले, “जलपर्णी न काढल्याने व त्याचा अहवाल सादर न झाल्याने तांदळे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यांनी त्याचे मुदतीत उत्तर न दिल्याने त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल.’

तांदळे म्हणाले, ’नोटीसला उत्तर दिलेले नाही, पण नोटीस मिळाल्यानंतर एक बैठक झाली. त्यामध्ये माहिती देण्यात आली. तसेच सर्व जलपर्णी 10 मार्चपर्यंत काढून घेतली जाईल. आतापर्यंत 60 टक्के जलपर्णी काढून झालेली आहे. या निविदेची मुदत 30 मार्चपर्यंत असून, संपूर्ण काम केले जाईल.’

जलपर्णी वाहून जाण्याची पाहिली जाते वाट
नदीमधील जलपर्णी वाढल्यानंतर ती जेथे आहे तेथून काढणे आवश्यक आहे. पण नदीचे पात्र खोल आहे, स्पायडर मशीन थांबण्यासाठी जागा नाही अशी कारणे देत ठेकेदारांकडून ठरावीक ठिकाणीच जलपर्णी काढली जाते. उर्वरित ठिकाणची जलपर्णी वाहून जाण्याची वाट पाहिली जाते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी जलपर्णी अडकली तर तेथे लगेच नवीन पाने फुटतात, पण तेथील जलपर्णी काढण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

Back to top button