पुणे : क्रीडा विद्यापीठाला 50 कोटींचा ‘बूस्ट’; कुलगुरूंची लवकरच नियुक्ती | पुढारी

पुणे : क्रीडा विद्यापीठाला 50 कोटींचा ‘बूस्ट’; कुलगुरूंची लवकरच नियुक्ती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील सुधारणांना प्राधान्य देत क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठ सुरू होणार असल्याचे केवळ आश्वासन मिळत असले तरी यावर्षीच्या अर्थसंकल्पात मिळालेल्या 50 कोटींच्या निधीमुळे विद्यापीठाला ‘बूस्ट’ मिळणार आहे.

2020-21 च्या अर्थसंकल्पात विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास मंजुरी देण्यात आली. हे विद्यापीठ सध्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे व नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरिता स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी अनावर्ती खर्च 200 कोटी रुपये, तर विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी 200 कोटी असे एकूण 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शासनाच्या वतीने ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुर्तास 50 कोटी रुपयांचा प्रस्ताव क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे पाठविण्यात आला होता. 2023 च्या अर्थंसंकल्पीय अधिवेशनात 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

स्पोर्ट्स सायन्स सेंटर होणार अद्ययावत
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर सुरू असून तेथे काही सोयी-सुविधा अत्याधुनिक दर्जाच्या करण्यात येणार आहेत. या अत्याधुनिक साहित्यासाठी अर्थसंकल्पामधून मिळालेल्या निधीचा उपयोग केला जाणार असल्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.

क्रीडा विद्यापीठासाठी यापूर्वी 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. आता यावर्षी पुन्हा 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, कुलगुरूंची नियुक्ती आणि इतर कामांसाठी या निधीचा उपयोग होऊ शकेल. शासनाकडून मिळणार्‍या आदेशाप्रमाणे या निधीचा विनियोग विद्यापीठाच्या कामांसाठी केला जाईल.

                         डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

Back to top button