पुणे : अर्धे जग आनंदले ! एसटी तिकिटात ५० टक्के सवलतीचे स्वागत | पुढारी

पुणे : अर्धे जग आनंदले ! एसटी तिकिटात ५० टक्के सवलतीचे स्वागत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एसटीचा प्रवास करणे खूप अडचणीचे होते…कामानिमित्त नियमित एसटीचा प्रवास करणे खर्चीक बाब आणि
परवडणारे नव्हते. आता राज्याच्या अर्थसंकल्पात एसटीच्या बस सेवेत तिकीट दरात महिलांना दिलेली 50 टक्के सवलत खूप लाभदायक आहे. एसटीचा नियमित प्रवास करणार्‍या महिलांसाठी ही योजना गरजेची असून, खासकरून ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना महत्त्वाची आहे, आता एसटीचा सवलतीतील प्रवास आणखी सुखकर होणार आहे, अशा प्रतिक्रिया महिला व युवतींनी व्यक्त केल्या आाहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पात एसटीच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत दिल्याच्या योजनेचे स्वागत करून नोकरदार नेहा आकिवाटे म्हणाले, अर्थसंकल्पात महिला-युवतींसाठी रोजगार, आरोग्य आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. महिला मुलीला सवलत मिळाल्याने आनंद वाटला.

एसटीच्या तिकीट दरात 50 टक्के सवलतीची योजना खूप चांगली आहे. अर्थसंकल्पात चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करण्याचा निर्णय चांगला आहे, सर्वसमावेशक महिला धोरणाची आताच्या घडीला आवश्यकता आहे. महिला-युवतींसाठी रोजगारविषयक तरतुदींची अर्थसंकल्पात कमतरता आहे. ते करायला हवे होते.

                                                             वर्षा ढाले (गृहिणी)

एसटीच्या प्रवासात सवलत, वसतिगृहांची निर्मिती अशा योजना चांगल्या आहेत. महिला-युवतींसाठी घरगुती लघुउद्योगांसाठी योजनांची आखणी करायला हवी होती.

                                             शिल्पा कुसाळकर-डोंगरे (नोकरदार)

अर्थसंकल्पात महिलांसाठी चांगल्या योजना करण्यात आल्या आहेत. एसटीच्या प्रवासात 50 टक्के सवलतीची योजना खूप महत्त्वाची असून, या निर्णयाचा लाभ लाखो महिलांना होऊ शकेल. महिला धोरणांचा निर्णयही स्तुत्य असून, महिलांच्या दृष्टीने अर्थसंकल्पात विचार करण्यात आल्याचे दिसते. फक्त ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्या आर्थिक मदतीसाठी ठोस योजना असायला हवी होती.

                                             वृषाली वडनेरकर (ग्राफिक डिझायनर)

Back to top button