पिंपरी : ‘शास्तीकर समायोजन’ला आयुक्तांचा हिरवा कंदिल

पिंपरी : ‘शास्तीकर समायोजन’ला आयुक्तांचा हिरवा कंदिल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर लादलेला शास्तीकर सरसकट माफ करण्यात आला. त्यामुळे निर्णयापूर्वी प्रामाणिकपणे शास्तीकर भरलेल्या मिळकतधारकांनाही समायोजन योजनेद्वारे लाभ देण्याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबद्दल भाजपा शहराध्यक्ष तथा आ. महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासानाचे आभार मानले आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर सरसकट माफ करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर 3 मार्च 2023 रोजी शास्तीकर माफीचा 'जीआर' महापालिका प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर पूर्वी प्रामाणिकपणे शास्तीकर भरलेल्या मिळकतधारकांनाही या निर्णयाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी सूचना आ. लांडगे यांनी प्रशासनाला केली होती. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर आमदार लांडगे यांनी आयुक्त शेखर सिंह यांनी भेट घेतली आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आभार मानले. 2008 पासून प्रलंबित असलेला शास्तीकराचा प्रश्न सोडवण्यासाठी आ. महेश लांडगे यांनी 2014 पासून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्या महापालिका प्रशासनाची साथ मिळाली. दरम्यान, ज्या मालमत्ताधारकांनी शास्तीकर सरसकट माफीच्या निर्णयापूर्वी अवैध बांधकाम शास्ती रकमेचा भरणा केला आहे. त्याचे समायोजन पुढील आर्थिक वर्ष सन 2023-24 पासून करण्यात
येणार आहे.

शास्तीकर सरसकट माफीबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत असताना महापालिका प्रशासनाने सहकार्य केले. तसेच, पिंपरी-चिंचवडकरांच्या भावना लक्षात घेऊन शास्तीकर माफीची अंमलबजावणी तात्काळ सुरू केली. यासह पूर्वी शास्तीकर भरलेल्या मिळकतधारकांना समायोजन योजनेचा लाभ देण्याबाबतही महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी निर्णय घेतला. तसे प्रशासनाने मला लेखी कळवले आहे. याबद्दल त्यांचे शहरवासीयांच्या वतीने आभार व्यक्त करतो.
                                              – आ. महेश लांडगे, भाजप शहराध्यक्ष.

शास्ती माफीचे प्रमाणपत्र मिळणार
शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने नागरिकांनी मूळ कर भरून अवैध बांधकाम शास्ती माफीचा लाभ करून घेण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी मूळ कराची रक्कम भरल्यास शास्ती माफीचे प्रमाणपत्रदेखील संगणक प्रणालीमधून उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे लेखी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाने आमदार महेश लांडगे यांना कळवले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news