भवानीनगर : छत्रपती सहकारी साखर कारखान्याला लवकरच गतवैभव प्राप्त होणार | पुढारी

भवानीनगर : छत्रपती सहकारी साखर कारखान्याला लवकरच गतवैभव प्राप्त होणार

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : ज्या आर्थिक संकटांमधून श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू होती त्या परिस्थितीवर आता पूर्णपणे मात केलेली आहे. नवीन प्रकल्पाचा शेवटचा हप्ता राहिलेला आहे तो गेल्यानंतर आपल्या डोक्यावर कर्ज राहणार नाही. पूर्वीची परिस्थिती व आजची परिस्थिती यामध्ये फार बदल झालेला आहे. लवकरच कारखान्याला गतवैभव प्राप्त होणार आहे, असा आत्मविश्वास कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी व्यक्त केला.

काटे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती कारखान्याच्या कामगारांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालक अ‍ॅड. रणजीत निंबाळकर, अ‍ॅड. लक्ष्मणराव शिंगाडे, राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव, अनिल काटे, अजित तावरे, युवराज रणवरे, हनुमंत करवर, जालिंदर शिंदे, प्रसाद राक्षे, वीरेंद्र वाबळे, तानाजी खराडे, गजानन कदम यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कामगार सभासद उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना काटे म्हणाले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामुळेच आपल्याला श्री छत्रपती कारखान्यावर काम करण्याची संधी मिळाली. श्री छत्रपती कारखान्याचा 2010-11 चा गाळप हंगाम माझ्या आयुष्यातील ऐतिहासिक गाळप हंगाम झाला. त्यावेळी आठ लाख 53 हजार टन उसाचे उच्चांकी गाळप जुन्या कारखान्यामध्ये केले. या हंगामात सर्वांनी मनापासून सहकार्य केले. त्यामुळे अशक्य गोष्ट शक्य करू शकलो. 2009-10 च्या गाळप हंगामामध्ये 650 एकर क्षेत्र गाळपाविना राहिले होते. 2010-11 च्या हंगामात कारखान्याच्या इतिहासात उच्चांकी गाळप करून तेवढाच अतिरिक्त ऊस 11 साखर कारखान्यांना देऊन अतिरिक्त उसाचे संपूर्ण गाळप करण्याचा प्रयत्न केला.

2019-20 च्या गाळप हंगामात कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे माझ्याकडे आल्यानंतर प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. गाळप हंगाम अतिशय खडतर असताना कारखान्याच्या तिजोरीत खडखडाट असताना ऊसतोडणी, वाहतुकीसाठी सुखदेव सानप, भाऊसाहेब आंधळे यांच्या सर्व सहकार्‍यांनी बिगर अ‍ॅडव्हान्स यंत्रणा उपलब्ध करून दिली. व्यापार्‍यांनीदेखील श्री छत्रपती कारखान्याच्या नावावर विश्वास ठेवून सहकार्य केले. या हंगामात 4 लाख 17 हजार टन उसाचे गाळप केले. कामगारांचे वेळेत पगार झाले नाहीत.

युवराज रणवरे सातत्याने या गोष्टींचा पाठपुरावा करायचे, कामगारांच्या अडचणी सांगायचे. त्या वेळी काही ठिकाणी मतभेद झाले. सर्वांनी एकोप्याने सहकार्य केल्याशिवाय हा गाडा पुढे गेला नसता. संचालक मंडळ, कामगार, सभासद यांचेही सहकार्य मिळाले. अ‍ॅडव्हान्समध्ये साखर व मळी विकली, त्यामुळे तोटा झाला असे आज दिसत असले तरी वास्तव वेगळे आहे. अ‍ॅडव्हान्स साखर व मळी विकली नसती, तर श्री छत्रपती कारखान्याचे चाक फिरू शकले नसते ही वस्तुस्थिती आहे.

गाळप हंगाम सुरू करताना कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन त्याचे व्याज किती होते, या सगळ्या गोष्टींचा हिशोब करूनच संचालक मंडळाने अ‍ॅडव्हान्समध्ये साखर व मळी विकण्याचा निर्णय घेण्याचा धाडस केले. सध्या सभासदांना इतर कारखान्यांपेक्षा दोन रुपये कमी मिळत आहेत त्यात सभासदांची नाराजी आहे; परंतु श्री छत्रपती कारखान्याला लवकरच पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे. येणार्‍या गाळप हंगामात साखरउतारा देणार्‍या उसाच्या जातींच्या गाळप होणार आहे तसेच पुढील ऊसलागवड नियोजन करताना कडक धोरण करून साखरउतार्‍याच्या उसाच्या जाती वाढवण्यासाठी संचालक मंडळ व शेतकी विभाग प्रयत्न करणार आहे, त्यामुळे साखरउतारा वाढून एफ. आर. पी. वाढण्यास मदत होणार आहे.

इतर साखर कारखाने व छत्रपती कारखाना यांच्यामध्ये एफआरपीचा जो तीनशे रुपयांचा ऊसदराचा फरक आहे तो कमी करण्यासाठी सभासदांचीच मदत लागणार आहे. कारखान्यामध्ये साखरउतारा वाढवण्यासाठी आपण वेगळं काही करू शकत नाही. संचालक मंडळ, सभासद, कामगार यांनी एकोप्याने केलेल्या कामामुळे छत्रपती कारखान्याचे रोपटे पुन्हा एकदा चांगलं बहरत असून, याचा लवकरच वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या काळात कामगारांच्या 80 टक्के अडचणी सोडवल्या आहेत. थोड्याफार राहिल्या आहेत. हा कठीण काळ संपल्यानंतर त्याही मार्गी लागतील, कोणीही वंचित राहणार नाही. शिक्षण संस्थेमध्ये बारा वर्षांपासून काम करताना अनेक अडचणी होत्या, त्यादेखील पूर्णपणे मार्गी लागल्या आहेत.

अजित पवार, दत्तात्रय भरणे यांच्यामुळेच अध्यक्ष
प्रशांत काटे म्हणाले, अविनाश घोलप यांनी छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. माझी मुलाखत सुरू असताना अजित पवार यांनी मला विचारलं, सांग कोणाला अध्यक्ष करायचे. त्या वेळी मी म्हणालो, मलाच अध्यक्ष करा. त्या वेळी ते म्हणाले, मंडळात ’एक से बढकर एक’ दिग्गज आहेत. मग मी म्हणालो राहिले. मी त्यांना अध्यक्ष करण्यासाठी कोणताही फोर्स केला नाही. मला वाटले नव्हते आपल्याला कारखान्याचे अध्यक्षपद मिळेल. निवडीचा दिवस आला आणि अचानक अध्यक्षपदासाठी माझे नाव जाहीर करण्यात आले. त्या वेळी मला आश्चर्याचा धक्का बसला. मी 18 महिने संचालक असताना अनुभव नसतानाही मला अजित पवार व दत्तात्रय भरणे यांनी अध्यक्षपदाची संधी दिली.

Back to top button