खेड तालुक्यात सोसायट्यांच्या निवडणुकीची धुळवड | पुढारी

खेड तालुक्यात सोसायट्यांच्या निवडणुकीची धुळवड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागात गावकी- भावकीच्या राजकारणात ग्रामपंचायत निवडणुकीएवढेच महत्त्व गावातील विविध कार्यकारी सोसायट्यांची निवडणुकीलादेखील असते. यामुळेच सध्या खेड तालुक्यातील खेड, आळंदी, भोसे, वाकी, कुरकुंडी आणि बीबीग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीची धुळवड सुरू आहे. संपूर्ण गावासह अन्य सभासद असलेल्या लगतच्या गावांच्या आर्थिक नाड्या ताब्यात ठेवण्यासाठी गावातील नेत्यांची यानिमित्त चढाओढ सुरू आहे.

गावाच्या आर्थिक नाड्या असलेली व प्रत्येक कुटुंब व शेतक-यांशी थेट संपर्क ठेवण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटी महत्त्वाची मानली जाते. गावकीच्या राजकारणात विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकीला यामुळेच खूप महत्त्व दिले जाते. खेड तालुक्यात 104 विविध कार्यकारी सोसायट्या असून, यापैकी 98 सोसायटीच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत.

आता शिल्लक सहा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली. यात खेड, आळंदी , भोसे, वाकी, कुरकुंडी आणि बीबीग्राम या सहा ही मोठ्या विविध कार्यकारी सोसायट्यांचा समावेश असल्याने गावातील राजकीय वातावरण तापले आहे. तालुक्यातील सर्वच नेत्यांचे देखील निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत.

शेतक-यांना पीक कर्जवाटप असेल, आर्थिक, दुर्बल घटकातील सभासदांना अल्प मुदतीचे कर्जवाटप, ट्रॅक्टरपासून सर्व प्रकारची शेती अवजारे घेण्यासाठीदेखील सोसायटीच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. गावातील व सभासद असलेल्या सर्वच पात्र सभासदांची आर्थिक गरज सोसायटीच्या माध्यमातून भागवली जाते. यामुळेच जिल्ह्यात ज्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला महत्त्व असते तसेच गावपातळीवर विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीला महत्त्व असते.

                            – हिरामण सातकर, विद्यमान संचालक
                          सिध्देश्वर खेड विविध कार्यकारी सोसायटी

गावातील विविध कार्यकारी सोसायटींच्या माध्यमातून शेतक-यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून आर्थिक शिस्त असणे आवश्यक असते. कारण गावातील गरीब, श्रीमंत सर्व घटकांना आर्थिक गोष्टींसाठी सोसायटीचा मोठा हातभार असतो. सध्या गावातील वरिष्ठ लोकांकडून, संचालकांकडून तरुण व उच्चशिक्षित पिढीला सोसायटी निवडणुकीत संधी दिली जाते.

                                 – गणेश काळे, ग्रामपंचायत सदस्य, कुरकुंडी.

पीक कर्ज, गुरे, गोठ्यासाठी, शेती अवजारे सर्व गोष्टींसाठी सोसायटीच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. यामुळेच थेट शेतक-यांची संपर्क ठेवण्यासाठी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे महत्त्व आहे. शंभर टक्के वसुली आणि पारदर्शक कारभार हाच खरा चांगल्या सोसायटीचा पाया आहे.

                                             – शिवाजी मुगसे, विद्यमान संचालक,
                                     आळंदी विविध कार्यकारी विकास सोसायटी.

Back to top button