वडगाव शेरी : सायबर क्राईमच्या वर्षभरात 70 तक्रारी | पुढारी

वडगाव शेरी : सायबर क्राईमच्या वर्षभरात 70 तक्रारी

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा : जुन्या सामानाची विक्री, कारसेवा, ट्रॅव्हल एजन्सी, टेंडर घेऊन देतो, ऑफर चालू आहे, गाडी विकणे, अशी विविध कारणे सांगून नागरिकांकडून ओटीपी घेऊन ऑनलाइन गंडा घातल्याच्या जवळपास 70 तक्रारी विमानतळ पोलिस स्टेशनला नोंदविण्यात आल्या आहेत. पोलिसांनी यापैकी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. इतर तक्रारींचा तपास सुरू आहे. विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी याबाबत माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाला मटेंडर देतो, आज टेंडरचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही तुमचा डीडी घेऊन माणूस लवकर पाठवा किंवा ऑनलाइन पैसे पाठवा,फ असा फोन आला होता. व्यावसायिकाने माहिती घेऊन संबंधिताला 1 लाख 28 हजार रुपये पाठविले. पण, त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन बंद केला. या प्रकरणाची संबंधित व्यावसायिकाने विमानतळ पोलिस स्टेशनला तक्रार केली आहे. याप्रमाणेच जुने सामान विकण्याच्या साइटवरून सामान घेण्यासाठी पैसे दिले. पण, त्यांनी पैसे घेऊन नंतर फोन बंद केला.

पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी कॅब बुक करण्यासाठी ऑनलाइन साइटवर फोन केला. पण, त्यानंतर अकाउंटमधून पैसे गेले. अशा वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. पाकीट मारण्याचे प्रकार कमी होत चालले असून, त्याऐवजी ऑनलाइन अकाउंटवर डल्ला मारण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या प्रकारच्या सायबर क्राईमच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. याबाबत सोंडे यांनी सांगितले की, ऑनलाइन लॉटरी, अश्लील फोटो टाकणे, बँक तसेच इतर कारणांसाठी ओटोपी मागून फसवणूक करण्याचे प्रकार होतात. फसवणुकीची पध्दत बदलली आहे. काळाप्रमाणे नागरिकांनी सायबर साक्षर होण्याची गरज आहे. सायबर क्राईमला बळी पडल्यावर नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा.

यामुळे तपासावर येतात मर्यादा
तांत्रिक अडचणी आणि इतर गोष्टींमुळे आरोपींना पकडणे आणि शिक्षा होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. पोलिस स्टेशनला सायबर क्राईम युनिट आहे. मात्र, या युनिटकडे आवश्यक सुविधा नाहीत. याचा परिणाम तपासावर होतो. अनेकदा खासगी सायबरतज्ज्ञांची मदत पोलिसांना घ्यावी लागत आहे.

Back to top button