पुणे : लाल मातीतच घेतला अखेरचा श्वास; पैलवान स्वप्निल पाडाळेचे निधन | पुढारी

पुणे : लाल मातीतच घेतला अखेरचा श्वास; पैलवान स्वप्निल पाडाळेचे निधन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लाल मातीत सराव करीत असताना एका पैलवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना हिंजवडीजवळील मारुंजी गावातील कुस्तीच्या तालमीत बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पैलवानाच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वप्निल ज्ञानेश्वर पाडाळे (वय 31) असे मृत्यू झालेल्या पैलवानाचे नाव आहे. बुधवारी सकाळी मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही दुर्दैवी घटना घडली. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातील पै. स्वप्निल पाडाळे हा महाराष्ट्र चॅम्पियन होता.

स्वप्निलच्या आकस्मिक जाण्याने त्याच्या मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. स्वप्निल नेहमीप्रमाणे मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे तो देखील व्यायाम करीत होता. व्यायाम करीत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली पडला. स्वप्निल अचानक खाली पडल्याचे पाहून तालमीतील इतरांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Back to top button