पुणे : मल्लिकार्जुन खर्गे यांची धंगेकरांनी घेतली भेट | पुढारी

पुणे : मल्लिकार्जुन खर्गे यांची धंगेकरांनी घेतली भेट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी बुधवारी बंगळुरू येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. खर्गे यांनी धंगेकर यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते. दिवसेंदिवस केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यांमधील भाजप सरकार यांच्याविरुद्धचा जनतेच्या मनातील रोष वाढत आहे.

महागाई, बेकारीमुळे त्रस्त जनतेला परिवर्तन अपेक्षित आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचा कसबा मतदारसंघातील विजय हा दिशादर्शक आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते यांनी एकजुटीने कठोर मेहनत करून भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय संपादन केला. याचाच अर्थ एकत्रित ताकदीने निवडणुका लढविल्या, तर भाजपचा पराभव होऊ शकतो, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. आगामी काळातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपसारख्या जातीयवादी प्रतिगामी पक्षाचा पूर्ण पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असे मत खर्गे यांनी व्यक्त केले.

उद्धव आणि राज ठाकरेंचीही घेतली भेट
आ. रवींद्र धंगेकर यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी काँग्रेससह शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. दोन्ही ठाकरेंनी धंगेकर यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button