पुणे : आता महाविद्यालयातही मिळणार जातवैधता प्रमाणपत्र; कार्यालयातील हेलपाटे वाचणार | पुढारी

पुणे : आता महाविद्यालयातही मिळणार जातवैधता प्रमाणपत्र; कार्यालयातील हेलपाटे वाचणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात आता जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासह तालुकापातळीवर असलेल्या महाविद्यालयांतही हे प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

आतापर्यंत राज्यात 10 लाख 4 हजार 461 जातवैधता प्रमाणपत्रे वितरित केलेली आहेत. समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून मंडणगड पॅटर्नच्या धर्तीवर महाविद्यालयातच जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणत्र देण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित काम पाहणारे कर्मचारी यांना मार्गदर्शन करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

मंडणगड पॅटर्नप्रमाणे राज्यातील 11वी व 12वी विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी समितीस्तरावरून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, शिक्षण विभाग यांच्याशी समन्वय साधून विशेष मोहिमेचे नियोजन करून स्थानिक पातळीवर या विशेष मोहिमेचा व्यापक प्रचार व प्रसार करणे, तसेच विशेषत्वाने महाविद्यालयीन पातळीवरील समान संधी केंद्र, संपर्क अधिकारी यांना समाविष्ट करून विशेष मोहीम सुसूत्र पध्दतीने पार पडेल, याची दक्षता घेण्याबाबत सर्व समित्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

जातप्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे ऑनलाइन कामकाज पूर्ववत

राज्यातील जातप्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे ऑनलाइन कामकाज सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले होते. आता ते पुन्हा सुरळीत झाले आहे, अशी माहिती बार्टीच्या वतीने देण्यात आली. राज्यातील सर्व 36 जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे ऑनलाइन कामकाज ऑनलाइन संकेतस्थळावरून केले जाते. मात्र, 3 मार्च रोजी सुरक्षिततेच्या कारणामुळे कामकाज बंद करण्यात आली होते. आता हे कामकाज सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे हे कामकाज पूर्वतवत सुरू झाले आहे.

इथे साधा संपर्क
विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) या कार्यालयाचा संपर्क क्र. 9404999452/9404999453 किंवा संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘बार्टी’ने केले आहे.

Back to top button