पुणे : महिन्याला 300 कोटी सिगारेटचा ‘धुऑ’ | पुढारी

पुणे : महिन्याला 300 कोटी सिगारेटचा ‘धुऑ’

शिवाजी शिंदे

पुणे : धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे, हे माहीत असूनसुद्धा सुशिक्षित, सुजाण म्हटल्या जाणार्‍या पुण्यात रोज तब्बल 10 कोटी, तर महिन्याला 300 कोटी सिगारेट ओढल्या जातात. त्यातून 600 कोटींची उलाढाल होते. सिगारेट ओढण्याचे प्रमाण तरुणांमध्ये सर्वाधिक आहे. केवळ तलफ म्हणून सिगारेट ओढण्यापेक्षा फॅशन म्हणून सिगारेट ओढल्या जात असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.

दरवर्षी मार्च महिन्यातील दुसरा बुधवार हा जागतिक धूम्रपानविरोधी दिन म्हणून जगभर पाळला जातो. मात्र, सिगारेट ओढण्यावर कुठलेही निर्बंध घातले जात नाहीत अथवा त्याबाबत कोणतीही जनजागृती केली जात नाही. सिनेमागृहात गेल्यावरच कधी काळी धूम्रपान आरोग्यास धोकादायक असल्याच्या जाहिराती आपण बघत असतो. मात्र, हल्ली या जाहिरातींचे प्रमाण कमी झाले आहे. सिगारेटच्या पाकिटावर ’धूम्रपान आरोग्यास धोकादायक’ असल्याचा वैधानिक इशारा छापला जातो.

मात्र, त्यापलीकडे याबाबत कुठलेही निर्बंध शासकीय अथवा सामाजिक पातळीवर होताना दिसत नाहीत. जगातील बहुतांश देशांत सिगारेटला मागणी आहे. त्याला पुणे शहर अपवाद नाही. या शहरात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा बोलबाला असल्याने सिगारेट विक्रीचे पुणे शहर हब झाले आहे. या शहरात शिक्षणासाठी देश-विदेशांतून तरुण आणि तरुणी येतात. त्यांनीच सिगारेट विक्री जास्त वाढवली असल्याचे दिसून आले आहे. मुली आणि महिलांमध्येही सिगारेट ओढण्याचे प्रमाण धक्कादायकरीत्या वाढू लागले आहे.

केंद्र आणि राज्य शासनाने धूम्रपान ओढण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात जीएसटी आणि सेस वाढवतात (जीएसटी 28 तर सेस 36 टक्के), तरी देखील सिगारेट विक्रीचे प्रमाण कमी होत नाही. शहर आणि परिसरात वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे 200 ब्रँड विक्रीसाठी आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिगारेटच्या पाकिटांची किंमत वेगवेगळी असून, किमान 20 रुपयांपासून पुढेच आहे.
कोविडकाळात सिगारेट ओढण्याचे प्रमाण कमी होऊन ते महिन्याला 100 कोटींवर आले होते. मात्र, पुन्हा हे प्रमाण वाढले आहे.

दररोज 10 कोटी सिगारेटची विक्री
सर्वाधिक प्रमाण तरुणाईत, मुलीही अग्रेसर
दरमहा शहरात 600 कोटींची उलाढाल
कोविड काळात झाली सर्वांत कमी 100 कोटींची विक्री
सुमारे दोनशे सिगारेट कंपन्यांचे ब्रँड उपलब्ध

तरुणांसाठी विक्री सोडण्याची तयारी

सिगारेट विकून पैसा मिळविणारे प्रमुख विक्रेतेही तरुणांनी सिगारेट सोडावी, या मताचे आहेत. सिगारेट आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे तरुणांनी सिगारेट सोडावी, असे मत एकाने ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले. तरुणांनी सिगारेट ओढणे सोडले तर तुमच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही का? असे विचारले असता त्यांनी ‘आम्ही काय, दुसरा व्यवसाय करू. तरुणांच्या आयुष्यापुढे ते काहीच नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली.

Back to top button