पुणे : महापालिकेकडून मिळणार मिळकतकराची दोन बिले | पुढारी

पुणे : महापालिकेकडून मिळणार मिळकतकराची दोन बिले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणेकरांना मिळकतकरात मिळणार्‍या 40 टक्के सवलतीवर अद्याप शासनाने निर्णय न दिल्याने महापालिकेकडून मिळकतधारकांना दोन बिले पाठवली जाणार आहेत. यामध्ये एक बिल मूळ मिळकतकराचे, तर दुसरे बिल 40 टक्के फरकाचे असणार आहे. दरम्यान, 40 टक्के फरकाच्या बिलावर निर्णय न झाल्याने बिल भरू नये, अशी टिप असणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

पानशेत पूर दुर्घटनेपासून पुणेकरांना निवासी मिळकतकरात 40 टक्के सवलत दिली जात होती. मात्र, राज्य सरकारच्या आदेशानुसार ही सवलत रद्द करण्यात आली आहे. महापालिकेने 2018 पासूनची सवलतीपोटीची रक्कम वसूल करण्यासाठी नागरिकांना एसएमएसच्या माध्यमातून नोटीस बजाविण्यास सुरुवात केली आहे. थकबाकीमुळे करदात्यांना मोठा आर्थिक बोजा पडत आहे. याशिवाय महापालिकेकडून अनधिकृत निवासी मिळकतींना दीडपट, तर व्यावसायिक मिळकतींना तीनपट इतका दंड (शास्ती) आकारला जातो. ही दंडाची रक्कम अवास्तव आहे. याविरोधात नागरिकांनी आवाज उठविला.

यासंदर्भात नागरिकांची नाराजी लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना थकबाकी न भरण्याचे आवाहन करीत 40 टक्के सवलत लागू करण्याचा आदेश राज्य सरकार काढेल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याला तात्पुरती स्थगिती दिली होती. आर्थिक वर्ष संपत आले, तरीही 40 टक्के सवलतीवर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर 40 टक्के सवलत लागू असलेल्या 97 हजार 500 मिळकतधारकांना नेहमीप्रमाणे मूळ कराचे बिल आणि 40 टक्के फरकाचे थकबाकीचे बिल, अशी दोन बिले पाठवली जाणार आहेत. ही दोन्ही बिले महापालिकेच्या www. propertytax. punecorporation. org या संकेतस्थळावर पाहता येतील. सवलतीच्या फरकाचे बिल भरू नये, अशी टिपही या बिलावर आहे. त्यामुळे नागरिकांनी ही थकबाकी निर्णय होईपर्यंत भरू नये, असे डॉ. खेमनार यांनी सांगितले.

किती आहेत मिळकती?
निवासी मिळकती ः 12 लाख 05 हजार 742
बिगर निवासी ः 1 लाख 58 हजार 570
मोकळ्या जागा ः 29 हजार 808
मिश्र ः 25 हजार 757
एकूण मिळकती ः 14 लाख 19 हजार 877

Back to top button