अतिक्रमणे होणार जमीनदोस्त; नसरापूरबाबत प्रांताधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय | पुढारी

अतिक्रमणे होणार जमीनदोस्त; नसरापूरबाबत प्रांताधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नसरापूरला (ता. भोर) सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नसरापूरमधील तरुणांनी रस्तारुंदीकरणाची मागणी केली होती. याबाबत प्रांताधिकार्‍यांनी तातडीने बोलाविलेल्या बैठकीत येत्या 15 दिवसांत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे नसरापूरचा रस्ता मोकळा होणार आहे.

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार कचरे यांच्या दालनात नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व अधिकारी यांच्या उपस्थित मंगळवारी (दि. 7) बैठक पार पडली. या वेळी प्रांत राजेंद्रकुमार कचरे, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील, नसरापूर मंडलाधिकारी श्रीनिवास कड्डेपल्ली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस. एस. संकपाळ, उपसरपंच संदीप कदम, सदस्य नामदेव चव्हाण, किरण शिनगारे, अतुल चाळेकर, संतोष सणस, सिद्धेश कांबळे आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी कचरे यांनी अतिक्रमण करणार्‍यांना नोटीस बजावून येत्या 15 दिवसांत रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेली अतिक्रमणे पाडण्याच्या सूचना नसरापूर ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. पक्के बांधकाम करणार्‍यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटीस दिली जाणार आहे.

सध्या रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर आहे. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस 9 मीटर रुंदीकरण होणार आहे. रुंदीकरणामध्ये अडथळा असणारे महावितरणचे पोल, झाडे काढली जाणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कामथडी व केळवडे रस्तामार्गे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, रात्री 8 पासून पहाटेपर्यंत मालवाहतूक करावी. येत्या दोन दिवसांत स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रांतधिकार्‍यांनी ग्रामपंचायतीला दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार रस्त्याची हद्द निश्चित झाली आहे. बुधवारी (दि. 8) मोजणी करून पुन्हा मार्किंग करण्यात येणार आहे. बेकायदा अतिक्रमण पाडण्यात येणार आहे.
                                        एस. एस. संकपाळ, बांधकाम विभाग अधिकारी

Back to top button