पिंपरी : तुकोबारायांचे विचार ठरताहेत दिशादर्शक ; देहू येथे शरद पवार यांचे प्रतिपादन | पुढारी

पिंपरी : तुकोबारायांचे विचार ठरताहेत दिशादर्शक ; देहू येथे शरद पवार यांचे प्रतिपादन

वडगाव मावळ : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे विचार चारशे वर्षांहुन अधिक काळ आपणाला दिशादर्शक ठरताहेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी श्रीक्षेत्र देहू येथे बोलताना केले. जगद्गुरू संत तुकोबारायांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावरील दिनदर्शिका अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रतिभा पवार, एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे प्रमुख जयंत म्हैसकर, आमदार सुनील शेळके, आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार उल्हास पवार, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीनमहाराज मोरे इनामदार, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, संदीप आंद्रे उपस्थित होते.

तत्पूर्वी पवार यांनी विठ्ठल मंदिरात स्वयंभू विठ्ठल आणि संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले. या वेळी उल्हास पवार म्हणाले, की तीर्थक्षेत्र विकासाची मुहूर्तमेढ पवारांनी रोवली. त्यामुळे आज देहू,आळंदीसह पंढरपुरच्या पालखी मार्ग सुसज्ज स्थिती दिसत आहे. पालखी मार्गावरील वृक्षारोपण, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा देण्यास पवार कायमच तत्पर असायचे. त्यांच्या दूरदृष्टीतून तीर्थस्थळ परिसर विकसित झाल्याची पहायला मिळतात. संत तुकोबारायांच्या जीवनावर चित्रफीत निर्माण करावी, अशी मागणी देहू संस्थानचे अध्यक्ष नितीनमहाराज मोरे यांनी प्रास्ताविकात केली. विकास कंद यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button