पिंपरी : शहरात गडगडाटासह पाऊस ; मावळात अवकाळीचा रब्बी पिकांना फटका | पुढारी

पिंपरी : शहरात गडगडाटासह पाऊस ; मावळात अवकाळीचा रब्बी पिकांना फटका

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवडसह मावळातही सोमवारी अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांबरोबरच कांदा बटाट्याचेही मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्याला फारसे यश आले नाही. मावळ वगळता पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि.7) सकाळी तुरळक पावसाने हजेरी लावली. पिंपरी चिंचवडसह मावळातील वडगाव,तळेगाव दाभाडे,लोणावळा, कामशेत आणि कार्ला परिसरात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. वडगाव येथे सायंकाळी मेघगर्जनेसह सुरुवात झाली. साधारण तासभर पाऊस पडत होता.

अचानक आलेल्या पावसामुळे शहरात होळीच्या उत्सवावर विरजण पडले. गोवर्‍या आणि लाकडे कोरडे ठेवण्यासाठी ग्रामस्थांची धांदल उडाली. तळेगाव शहर आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा सुमारे पाऊण तास खंडित झाला होता; तसेच शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली. मंगळवारी शहरात सकाळी ढगाळ वातावरण होते. तर, दुपारी उन आणि सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण होते. तसेच 8 आणि 9 मार्च सकाळी आकाश निरभ— राहील. दुपारी आणि सायंकाळी ढगाळ वातावरण होउन हलका ते मध्यम स्वरुपाचा पाउस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Back to top button