पुणे : अनुसूचित जातींना सामाजिक प्रतिनिधित्व हवे; शरद पवार यांच्यासोबत चर्चा | पुढारी

पुणे : अनुसूचित जातींना सामाजिक प्रतिनिधित्व हवे; शरद पवार यांच्यासोबत चर्चा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गात नागरिक विकासापासून दूर आहेत. त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात योग्य ते प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी अपेक्षा अनुसूचित जातींच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली. अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांच्या नेतृत्वात बौद्ध, मातंग, चर्मकार, वाल्मिक, गारुडी, कैकाडी, बुरुड, पारधी, मसनजोगी, खाटीक, माला, जंगम, बेरड, होलार, रामोशी, आदी जातींच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांची भेट घेतली.

आम्ही मागासलेले असून, अजूनही आमच्यात समन्वय नाही. आम्ही आपापल्या जातींच्या परिघातच जगत होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मानवी आणि लोकशाही हक्क दिले. परंतु, आम्ही एकत्र येऊन चळवळ केली नाही. उच्चभ्रूंनी आमच्या विकासाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली नाही. आज पहिल्यांदा एकत्र आलो आहोत, असे मत अ‍ॅड. गायकवाड यांनी व्यक्त केले. संख्येने कमी असाल, तरी तुम्ही पक्षासाठी महत्त्वाचे आहात.

केवळ सत्तेचे राजकारण न करता, समाजातील दुर्बल व छोट्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडून आगामी काळात केंद्र व राज्य सरकारकडून आपले प्रश्न सोडवू, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. तसेच सर्व उपेक्षित घटक जातींच्या प्रतिनिधींची महाराष्ट्र पातळीवर एक कृती समिती तयार करावी व या समितीने विविध जातींच्या प्रश्नावर काम करावे, अशी सूचनाही पवार यांनी केली.

Back to top button