अवकाळीने बेट भागात डाळिंबबागांचे नुकसान | पुढारी

अवकाळीने बेट भागात डाळिंबबागांचे नुकसान

टाकळी हाजी(शिरूर); पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सोमवारी सायंकाळी जोराचा वारा आणि पावसामुळे डाळिंबबागांसह गहू, हरभरा, मका, कांदा, द्राक्षे, खरबूज या पिकांना फटका बसला. काढणीला आलेली पिके भुईसपाट झाली.
या भागात डाळिंबबागा मोठ्या प्रमाणात आहेत. बागांना उन्हाच्या कडाक्यामुळे क्रॉप कव्हर कागदाचे आच्छादन केले होते. वार्‍यामुळे काही शेतकर्‍यांचे कागद उडून गेले. परिणामी, कागदाचा खर्च पुन्हा एकदा करावा लागणार आहे.

काही शेतकर्‍यांच्या बागांना बनविलेले तारांचे मंडप पडले आहेत. अवकाळी पावसामुळे डाळिंबबागेत तेल्या, करप्या तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, महागडी औषधे फवारावी लागणार आहेत. आधीच शेतमालाला समाधानकारक बाजारभाव नाहीत, त्यात चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी कर्जबाजारी होऊन डाळिंबाची काळजी घेतात. मात्र, आता अचानक खर्च वाढल्याने डाळिंब शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

पिकांसाठीचा खर्च वाढत चालला असून, निसर्ग जगू देईना आणि शासन हमीभाव देईना, अशी परिस्थिती डाळिंब उत्पादकांची झाली आहे. कृषी विभागही शेतकर्‍यांकडे डोळेझाक करीत आहे. शासकीय योजनांसाठी शेतकर्‍यांची अडवणूक केली जात आहे.

                                          पंढरी उचाळे, शेतकरी, टाकळी हाजी

Back to top button