उंडवडी : अवकाळीच्या भीतीने शेतकरी धास्तावला; काढणीस आलेली पिके धोक्यात | पुढारी

उंडवडी : अवकाळीच्या भीतीने शेतकरी धास्तावला; काढणीस आलेली पिके धोक्यात

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : उंडवडी सुपेसह आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी अवकळीच्या भीतीने धास्तावला आहे. हातात आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतक-यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी (दि. 6) रात्री दहानंतर पावसाने थोडी हजेरी लावली. रात्री वाराही जोरदार असल्याने रात्री शेतक-यांची धावपळ झाली. शेतात काढून ठेवलेला गहू, मका, वैरण झाकण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागली.

मंगळवारी (दि. 7) सकाळपासूनच विजांचा जोरदार कडकडाट होत होता, तर गार वारेही सुटल्याने अवकाळी होणार अशी भीतीही शेतक-यांच्या मनामध्ये निर्माण झाली. काही शेतक-यांनी गहू, ज्वारी, मका काढला असून पीक शेतातच ठेवले आहे, तर काही शेतक-यांची पिके काढण्यास वेळ आहे; परंतु गारपीट होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी रब्बी हंगामातील पिके काढण्यासाठी लगबग करत आहेत.

थोडा पाऊस, तर दिवसभर आभाळ येत असल्याने मका पिकांसह रब्बी हंगामातील पिके धोक्यात सापडली आहेत. दुसरीकडे अचानक पाऊस येत असल्याने हरभरा तसेच जनावरांचा चारा झाकण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. हा पाऊस शेतक-यांसाठी नुकसानकारक आहे.

                                                    दादा तावरे, शेतकरी, कारखेल

Back to top button