पुणे : झेडपी लिपीक संपावर जाणार | पुढारी

पुणे : झेडपी लिपीक संपावर जाणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व लिपीक कर्मचार्‍यांनी 14 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसह झेडपीच्या लिपीक कर्मचार्‍यांच्या वेतन त्रुटी आणि इतर प्रश्नांसाठी हा संप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या लिपीक कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, लिपिकांच्या बदल्यांबाबत अन्यायकारक धोरण रद्द करणे, सुधारित आकृतिबंधामध्ये लिपिकांची पदे वाढविणे, झेडपीच्या कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे गृहबांधणीसाठी अग्रीम मिळावे, सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समितीमधील लिपीक 14 मार्चपासून संपामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शेखर गायकवाड आणि सचिव किशोर कुलकर्णी यांनी दिली. जुनी पेन्शन योजना त्वरित सुरू करावी, ही प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर लिपीक कर्मचार्‍यांसाठी समान काम, समान वेतन आणि समान पदोन्नती टप्पे यासाठी समिती गठित केली होती. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागास तसा अहवाल समितीने दिला होता. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्याप्रमाणे अद्याप कार्यवाही झालेली नाही.

Back to top button