मार्केट यार्ड परिसरात धूलिवंदनाच्या दिवशी भरदुपारी गोळीबार | पुढारी

मार्केट यार्ड परिसरात धूलिवंदनाच्या दिवशी भरदुपारी गोळीबार

पुणे/ बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील मार्केट यार्ड येथील आंबेडकरनगरमध्ये एकावर गोळीबार करत त्याला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार धूलिवंदनाच्या दिवशी घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. गोळीबारात गवळी नावाच्या व्यक्तीच्या हाताला गोळी लागली असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संतोष वामन कांबळे असे गोळीबार करणार्‍याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरात आंबेडकरनगर वसाहतीत मंगळवारी दुपारच्या सुमारास संतोष कांबळेला मारण्यासाठी जखमी प्रशांत उर्फ प-या गवळी हा कोयता घेऊन आला होता. त्याला प्रतिकार करत संतोष कांबळेने प्रशांत गवळी याच्यावर बंदूकीतून तीन राउंड फायर केले. यात प्रशांत गवळी जखमी झाला असून, त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच तडीपारीतून मुक्त झालेला सराईत गुन्हेगार प्रशांत गवळी हातात हत्यार घेऊन झोपडपट्टीतून फिरत होता. त्यावेळी त्याच्या घराजवळील गुन्हेगार संतोष वामन कांबळे याने हत्यार घेऊन का आलास, असे विचारले. तेव्हा प्रशांत गवळीने संतोष कांबळे याला, ’मी तिकडे असताना माश्या विषयी पाठीमागे वाईट बोलत होतास,’ असे म्हणून हातातील कोयता उगारला. संतोष कांबळेने हातातील कोयता हिसकाऊन घेतला. तसेच प्रशांतला घरी जाण्यास सांगितले.

थोड्या वेळाने प्रशांत पुन्हा वेगाने पळत येत असल्याचे पाहून संतोष घरात गेला. त्याने घरात जाऊन गावठी कट्टा आणून बैल बाजाराशेजारील हातभट्टी दारूच्या धंद्याजवळ गावठी कट्ट्यातून एक राउंड फायर केला. त्यातून निघालेल्या गोळीतून प्रशांत जखमी झाला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. घटनास्थळी अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त देशमुख, मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे तपास करीत आहेत.

Back to top button