

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पतीच्या, सासरच्या टोमण्यामुळे पत्नीच्या हृदयात ब्लॉकेज तयार झाल्याची तक्रार धनकवडीतील महिलेने दिली आहे. नातेवाइकांनी संबंधित महिलेला मारहाण करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना जुलै 2021 ते मार्च 2023 कालावधीत घडली. याप्रकरणी प्रतीक चोथे (पती), दिलीप चोथे (सासरा), अंजली क्षीरसागर, वैशाली शिंदे, विद्या भगत, रूपाली तोडमल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरती चोथे यांनी सहकानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती आणि प्रतीक यांचे 2021 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सासरी नांदत असताना आरतीला पतीकडून हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. तुला काहीच येत नाही, असे टोमणे मारत तिचा छळ केला जात होता. अन्य नातेवाइकांकडूनही आरतीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळे हृदयात ब्लॉकेज तयार झाल्याची तक्रार आरती यांनी देत सहकानगर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक यादव तपास करीत आहेत.