पुणे : द्राक्षांची गुणवत्ता घसरण्याची शक्यता | पुढारी

पुणे : द्राक्षांची गुणवत्ता घसरण्याची शक्यता

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह सोमवारी (दि. ६) सायंकाळी नारायणगाव, वारुळवाडी, कोल्हे मळा, गुंजाळवाडी परिसरात पाऊस झाला. पावसामुळे शेतकरीवर्गाची पळापळ झाली. गहू, हरभरा तसेच द्राक्ष बागायतदारांचे यामुळे नुकसान झाले. द्राक्षाची गुणवत्ता पावसामुळे घसरण्याची शक्यता आहे. नारायणगाव परिसरात गहू, हरभरा पिकांची काढणी सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली.

यामुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. आंब्याला आलेला मोहोर तसेच लगडलेल्या कैऱ्या गळून पडल्या. पावसामुळे काही ठिकाणी द्राक्षपिकाचे नुकसान झाले. द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संदीप वारुळे यांनी वर्तवली. यामुळे द्राक्षाची गुणवत्ता घसरून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. ७) दुपारी पुन्हा हलक्या सरी बरसल्या. पावसाने जोर धरल्यास फळभाज्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Back to top button