पुणे : अखेर ‘त्या’ प्रकरणात नाझिरकरांसह अन्य १२ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : अखेर 'त्या' प्रकरणात नाझिरकरांसह अन्य १२ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : जमीन विक्रीसाठी खोटे कुलमुखत्यार बनवून स्वतःच्या फायद्यासाठी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राज्य शासनाच्या नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझिरकर यांच्यासह अन्य १२ जणांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दै. पुढारीने सोमवारी (दि. ६) वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली होती.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये हनुमंत जगन्नाथ नाझिरकर, संगिता हनुमंत नाझिरकर (रा. चतुःश्रृंगी, पुणे), राजेश भगवान लोंढे (रा माळवाडी, हडपसर, पुणे), श्रीनिवास अरुण कवडे (रा. महंमदवाडी, पुणे), सनी लक्ष्मण चव्हाण (रा. आमराई, बारामती), सोमा देवकर, ओंकार शिंदे, राज सोनवणे, सोहेल शेख (पूर्ण नावे नाहीत. रा. बारामती) व अन्य अनोळखी तिघांचा समावेश आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अर्जुन यशवंत झगडे (रा. शिर्सूफळ, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणात ११ जणांची फसवणूक झाली.

फिर्यादी हे त्यांचे सहकारी विनोद दासा चौधर, महेश बापू चौधर, सूरज शिवाजी भोसले, ईश्वर माऊली वणवे, एकनाथ किसन धोंडे यांच्यासह जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. जानेवारी २०२३ मध्ये त्यांना सनी चव्हाण, सोमा देवकर, ओंकार शिंदे, राज सोनवणे भेटले. त्यांनी सावळ येथील गट नं. २६९ मधील हनुमंत नाझिरकर यांचे ११ एकर क्षेत्र त्यांच्या पत्नी संगीता यांच्या नावे असून ते विकण्याचे असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादी त्यांच्यासोबत हे क्षेत्र बघण्यासाठी गेले. व्यवहार आमच्याशी करावा लागेल असे या चौघांनी फिर्यादीला सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी नाझिरकर यांनी त्यांची भेट घेतली. बारामतीत माझी मोठी मालमत्ता असून सावळ येथील क्षेत्र विक्री करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार हा व्यवहार चार कोटी रुपयांना ठरला.

या क्षेत्राचे मुखत्यारपत्र संगीता नाझिरकर यांच्या वतीने राजेश लोंढे व श्रीनिवास कवडे यांच्या नावे करण्यात आले. विसारापोटी २५ लाख रुपये देण्यात आले. परंतु मुखत्यारपत्र तयार करताना नाझिरकर यांच्या जागी दुसरीच महिला उभी कऱण्यात आली. तिने खोटी कागदपत्रे देत मुखत्यारपत्र तयार करून दिले. २ कोटी ५० लाख रुपये रोखीत स्विकारण्यात आले. तर ६२ लाख ३० हजारांची रक्कम संगिता नाझिरकर यांच्या बॅंक खात्यावर भरण्यात आली. एकूण ३ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. परंतु या प्रकरणातील मुखत्यारपत्रच बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्यांनी पोलिसांत धाव घेतली होती. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

 यापूर्वी अनेक गुन्हे दाखल

नाझिरकर व त्यांच्या कुटुंबियांवर यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विबागाने बेहिशोबी मालमत्ता तसेच बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचे दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत. अनेक प्रकरणात ते यापूर्वी जेलमध्ये होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर हा प्रकार घडला आहे.

यापूर्वीच गुन्ह्यात अटकावून ठेवलेल्या जमिनीचा व्यवहार

सावळ येथील ज्या शेतजमिनीचा व्यवहार झाला, ती मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वीच गुन्ह्यात अटकावून ठेवली आहे. तरीही तिची परस्पर विक्री करण्याचा आणि त्यासाठी खोटे कुलमुखत्यारपत्र तयार करण्याचा प्रकार घडला आहे.

Back to top button