पुणे : आंधळं दळतय अन…! राजगुरूनगर नगरपरिषदेत सावळागोंधळ | पुढारी

पुणे : आंधळं दळतय अन...! राजगुरूनगर नगरपरिषदेत सावळागोंधळ

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा :  आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातय..या म्हणीप्रमाणे राजगुरूनगर नगरपरिषदेचा कारभार सुरू असल्याचे खेड तालुका मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. अनेक नागरिकांनी घरपट्टी (मिळकत कर) भरलेली असताना आणि त्या पावती घरात असताना त्यांना गेल्या सात वर्षात आपण घरपट्टी भरलेली नसून ती तातडीने भरावी! अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा नोटीस राजगुरूनगर नगरपरिषदेकडुन पाठविण्यात आल्या आहेत. यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला असून  या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

नगरपरिषदेच्या अशा मनमानीविरुद्ध तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, मंगेश सावंत, राजगुरूनगर शहराध्यक्ष सोपान डुंबरे, सुजित थिगळे, आदित्य शिर्के, रुपेश ताये आदींनी सोमवारी (दि. ६) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

सन २०१४ मध्ये राजगुरूनगर नगरपरिषद अस्तित्वात आली. एक वर्षानंतर नगरसेवक निवडले गेले. मात्र पाच वर्षातील कारभार पाहता ग्रामपंचायत बरी होती असे नागरिक बोलत आहेत. पंचवार्षिक काळात नगरपरिषदेत अनेक चुकीचे कारभार आणि गैरव्यवहार उघडकीस आले. २०१६-१७ मध्ये कर्मचाऱ्यांनी कर वसुली केली; मात्र ७७ लाख रुपयांची रक्कम नगरपरिषद खात्यावर जमा केली नव्हती. असाच प्रकार सध्या सुरू असून त्यावर कोणाचाही अंकुश नाही. नगरपरिषदेवर गेली दोन वर्षे प्रशासक आहे. जबाबदार अधिकारी पुर्ण वेळ नाहीत.

त्यामुळेच काही कर्मचाऱ्यांनी एजंट नेमून शहरात घरोघरी थकीत कर वसुली सुरू केली आहे. मात्र त्यातील अनेकांनी यापूर्वीच घरपट्टी रक्कम भरलेली असल्याचे यावेळी समीर थिगळे व सहकाऱ्यांनी कागदपात्रांच्या आधारे पत्रकारांना दाखवले. अशा प्रकारे होणाऱ्या बेबंदशाही विरोधात लवकरच मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे ते म्हणाले.

Back to top button