पिंपरी : उद्योगांतील घातक कचर्‍याचा प्रश्न गंभीर | पुढारी

पिंपरी : उद्योगांतील घातक कचर्‍याचा प्रश्न गंभीर

दीपेश सुराणा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चिंचवड एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी आणि चिखली-कुदळवाडी, तळवडे या परिसरात सध्या कंपन्यांतील घातक कचर्‍याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या परिसरातील चार ते साडेचार हजार छोट्या-मोठ्या उद्योगांना ही समस्या जाणवत आहे. उद्योगधंद्यातून तयार होणारी मळी किंवा मिश्रण यात विषारी धातू, तेल, घातक रसायने असतात. उद्योगांतील घातक कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबतची कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे सध्या अस्तित्वात नाही. रांजणगाव येथील खासगी कंपनीकडे सध्या उद्योजकांना हा कचरा पाठवावा लागत आहे.

हा निर्माण होणारा कचरा कंपन्या त्यांच्या आवारात, रस्त्यावर किंवा इतरत्र टाकतात. चिंचवड आणि भोसरी एमआयडीसी, चिखली-कुदळवाडी परिसरात घातक कचर्‍या महापालिकेकडून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. शहरातील एमआयडीसी परिसरात एकूण कचर्‍याच्या तुलनेत 10 ते 15 टक्के इतका घातक कचरा निर्माण होतो. या कचर्‍याचे विघटन न करता तो उघड्यावर टाकण्यात येतो. त्यामुळे हा कचरा रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पडलेला आढळतो. विशेषतः कुदळवाडी परिसरात या कचर्‍याचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे, सायंकाळी कचरा जाळण्याचे प्रकारही घडतात. प्लास्टिक जाळण्यात येते. त्यामुळे प्रदूषण होते. त्याबाबत महापालिकेकडून उपाययोजना होणे गरजेचे आहे.

केवळ चर्चा नको, कारवाई हवी
पिंपरी-चिंचवड महापालिका, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि लघुउद्योजक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक यांची समन्वय बैठक नेहरूनगर येथे दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आली होती. औद्योगिक क्षेत्रातील कचर्‍याचे योग्य विलगीकरण होत नाही, याविषयी या बैठकीत चिंता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे, समन्वयाने काम करून घातक कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनदेखील महापालिका प्रशासनाने दिले होते. ’एमआयडीसी’ भागातच कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र उभारण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यासाठी औद्योगिक कंपन्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती. याबाबत आता केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कार्यवाहीच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे.

घातक कचरा म्हणजे काय ?
घातक कचरा म्हणजे असा अवशेष आहे जो त्याच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या कोणत्याही सजीवाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. या कचर्‍यामध्ये प्रामुख्याने काच, बॅटरी, सेल्स, रंग, रसायने, तुटलेले बल्ब, ट्युबलाइट्स, कीटकनाशके, जंतुनाशके आदींचा समावेश होतो.

महापालिका प्रशासनाने घातक कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. केवळ उद्योजकांकडून अपेक्षा ठेवणे रास्त नाही. घातक कचर्‍याबाबत उपाययोजना करण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. रांजणगाव येथील कंपनीकडे उद्योजकांनी घातक कचरा द्यायचा आहे. त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात. उद्योजक विविध कर भरत असताना त्यांना घातक कचरा संकलनाची सुविधा महापालिका प्रशासनाने देणे गरजेचे आहे. केवळ रांजणगाव येथील खासगी कंपनीवर अवलंबून राहणे योग्य नाही.

             – संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

एमआयडीसी, चिखली आणि कुदळवाडी परिसरात महापालिकेकडून घातक कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नाही. येथे रस्त्याच्या कडेला घातक कचरा पडलेला असतो. या कचर्‍याचे महापालिकेने मोशी येथील कचरा डेपोमध्ये व्यवस्थित विघटन करायला हवे. तो कचरा अलग करून त्यावर प्रक्रिया करण्यात यावी.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

उद्योगांचा घातक कचरा हा रांजणगाव येथील कंपनीकडे जाणे आवश्यक आहे. उद्योगांनी निर्माण होणार्‍या घातक कचर्‍याची त्यांच्या स्तरावर विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

            – संजय कुलकर्णी, सह-शहर अभियंता (पर्यावरण), महापालिका.

Back to top button