पुणे : महाविद्यालयांचे होणार ऑडिट; 20 मार्चपर्यंत माहिती भरण्याचे निर्देश | पुढारी

पुणे : महाविद्यालयांचे होणार ऑडिट; 20 मार्चपर्यंत माहिती भरण्याचे निर्देश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सर्व माहिती येत्या 20 मार्चपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लिंकवर भरावी, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठाचे उपकुलसचिव स. दा. डावखर यांनी दिले आहेत. शिक्षण शुल्क समितीच्या 25 नोव्हेंबर 2022 च्या बैठकांच्या इतिवृत्तानुसार राज्यातील विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचे शैक्षणिक लेखापरीक्षण करण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांना शिक्षण शुल्क समितीमार्फत कळविण्यात आले होते.

या निर्णयाच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत विद्यापीठांतर्गत असलेल्या विनाअनुदानित व कायमविना अनुदानित बी.एड. एम.एड. बी.पी.एड. एम.पी.एड. विशेष बी.एड व एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम चालविणार्‍या महाविद्यालयांचे शैक्षणिक लेखापरीक्षण करावे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उच्च शिक्षणचे संचालक आणि शिक्षण शुल्क समितीच्या सहसंचालकांना पाठविण्यात यावा, असे स्पष्ट आदेश शिक्षण शुल्क समितीचे सहसंचालक हरिविजय शिंदे यांनी दहा विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत. त्यानुसारच विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 चे कलम 117 नुसार संलग्न महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्थेची शैक्षणिक व विद्याविषयक तपासणी करण्यात येणार असल्याचे डावखर यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button