

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ मतदारसंघातील नगरसेवकांची निष्क्रियता आणि प्रमुख पदाधिकार्यांची वर्तणूक याचा पक्षाला फटका बसला. याशिवाय, मतदारसंघाबाहेरून आलेली यंत्रणा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी ही निवडणूक ताब्यात घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला असल्याचे भाजपच्या बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांनी पक्षाच्या चिंतन बैठकीत ठणकावून सांगितले.
कसबा पेठ पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर या मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांची चिंतन बैठक रविवारी सायंकाळी झाली. या बैठकीला उमेदवार हेमंत रासने यांच्यासह मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, माजी सभागृह नेते सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक सम्राट थोरात, गायत्री खडके, आरती कोंढरे, मनीषा लडकत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्यावर पराभवाचे खापर फोडले. पक्षाचे काही पदाधिकारी ग्राऊंड लेव्हलवर काम न करता केवळ मिरवण्याचे काम करीत होते. पक्षातील शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख यांच्याशीही पदाधिकारी नीट बोलत नव्हते. तर, नगरसेवकांच्या पाच वर्षांच्या कारभाराचा फटकाही बसला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. नगरसेवकांनी पाच वर्षांत नागरिकांची कामे केली असती आणि त्यांच्याशी संपर्क ठेवण्याची गरज होती.
मात्र, आपले नगरसेवक चारचाकीतून काचा खाली न करता फिरत होते. प्रचारात फिरताना आम्हाला नागरिकाकडून यासंबंधीच्या तक्रारी ऐकून घ्याव्या लागत होत्या, अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. उपस्थितांनी त्यास प्रतिसाद दिला, असे उपस्थित कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'पुढारी'शी बोलताना माहिती दिली. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारात जी काही मंडळी बाहेरची यंत्रणा आणून कामाला लावण्यात आली होती, त्यावरही काहींनी नाराजी व्यक्त केली. बाहेरून आलेली ही मंडळी काम न करता केवळ मिरवत होती,असेही काहींनी सांगितले.
दरम्यान, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उपस्थित पदाधिकार्यांनी या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केले. तरी आपला पराभव का झाला, याचे चिंतन करून यापुढे आता पुन्हा जोमाने कामाला लागुयात, तसेच या घरोघरी जाऊन मतदारांना आभाराचे पत्रक देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या वेळी उमेदवार रासने यांनी निवडणुकीत जिवाचे रान करून काम केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, की यापुढे मी गल्लीबोळात जाऊन काम करणार आहे. कोणत्याही कामासाठी आणि कार्यक्रमाला मला बोलवा मी येईल, असे त्यांनी सांगितले.
माजी नगरसेवकांची बैठकीकडे पाठ
कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे 16 नगरसेवक आहेत. प्रत्यक्षात मात्र केवळ पाच ते सहा जण या बैठकीला उपस्थित होते, उर्वरित माजी नगरसेवकांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली.