पुणे : मेट्रो महिन्याभरात पुढच्या स्थानकांत; मेट्रो मार्गांची कामे मार्चमध्ये होणार पूर्ण | पुढारी

पुणे : मेट्रो महिन्याभरात पुढच्या स्थानकांत; मेट्रो मार्गांची कामे मार्चमध्ये होणार पूर्ण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महामेट्रोच्या दोन्ही मेट्रो मार्गांची कामे मार्चमध्ये पूर्ण केली जाणार आहेत. त्याची चाचणी झाल्यानंतर न्यायालयापर्यंत पिंपरीतून, तसेच पौड रस्त्यावरून मेट्रोने ये-जा करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी सहा मार्च रोजी 12 किलोमीटर मार्गावरील मेट्रो सुरू करण्यात आली. त्या पुढील मेट्रोची वाहतूक महिनाभरात सुरू होणार आहे.

पुण्यातील मेट्रोची कामे लवकर म्हणजे गेल्या नोव्हेंबरपासून पूर्ण करण्याची आश्वासने मेट्रोचे अधिकारी, तसेच पालकमंत्री यांनी वारंवार दिली होती. त्यानंतर, पुढील तारखांची आश्वासने देण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कामांना उशीर होत गेला. त्यामुळे मेट्रो धावण्यास विलंब होत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर महामेट्रोने मार्चअखेर चाचण्या पूर्ण केल्या जातील, असे स्पष्टीकरण रविवारी दिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट (17 किमी) आणि वनाझ ते रामवाडी (16 किमी) असे 33 किमी लांबीचे मेट्रोचे दोन मार्ग आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेपासून फुगेवाडीपर्यंत (7 किमी) आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक (5 किमी) या मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी केले. त्या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.

फुगेवाडी, गरवारे महाविद्यालय आणि रुबी हॉल येथून सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंतच्या मार्गिकेची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पुणे मेट्रोने केले आहे. त्यानंतर रेल संरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणांची पूर्तता केल्यानंतर हे तीन मार्ग प्रवाशांसाठी खुले करता येतील, असे महामेट्रोतर्फे रविवारी सांगण्यात आले.

मेट्रो स्थानकाची कामे प्रगतिपथावर
दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर या स्थानकांची कामे 95 टक्के पूर्ण झाली असून, या मार्गांवर आधीच मेट्रोची चाचणी घेतली आहे. डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका या महत्त्वाच्या स्थानकांची, तसेच सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉलदरम्यान मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्थानक येथील मेट्रो स्थानकांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.

न्यायालय स्थानकात 10 सरकते जिने
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक येथे भूमिगत स्थानकातून उन्नत स्थानकात ये- जा करण्यासाठी 10 एस्किलेटर (सरकते जिने), 6 लिफ्ट आणि प्रशस्त जिने यांची व्यवस्था केली आहे. सिव्हिल कोर्ट स्थानकात वाहनतळ, पीएमपी बसथांबा, प्रवाशांना सोडणार्‍या गाड्यांसाठी स्वतंत्र रस्ता करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकातून दिवाणी न्यायालयात जाण्यासाठी स्वतंत्र भूमिगत पादचारी मार्ग बनविण्यात येणार आहे.

फुगेवाडी, गरवारे कॉलेज आणि रुबी हॉल हे मेट्रोने सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक जोडल्यामुळे पुण्यातील महत्त्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत. पुढील टप्प्यातील रुबी हॉल स्थानक ते रामवाडी स्थानक आणि सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गिकांची कामे प्रगतिपथावर आहेत. ते मार्गदेखील लवकरच खुले करण्यात येथील.
                    – डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.

Back to top button