पुणे : केडगावात चोरट्यांचा धुमाकूळ; रात्रीत मेडिकल, दुकान, हॉटेलमध्ये चोरी | पुढारी

पुणे : केडगावात चोरट्यांचा धुमाकूळ; रात्रीत मेडिकल, दुकान, हॉटेलमध्ये चोरी

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव, दापोडी परिसरात (सोमवार) मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार मेडिकल, एक किराणा दुकान आणि दोन हॉटेल फोडून चोरट्यांनी एक लाख चार हजार रोख आणि पंचवीस हजार रूपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्‍याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरट्यांनी दोन तासांत या ठिकाणी केली चोरी

चोरट्यांनी दोन तासांत या सर्व ठिकाणी चोरी केली आहे. चोरट्यांनी शटर उचकटली, दाराचे कडी, कोयंडे तोडले. सर्व चोऱ्या अर्धा किलोमीटर परिघात घडल्‍या आहेत. प्रत्येक चोरी कमीत-कमी पाच मिनिटे आणि जास्तीत जास्त दहा मिनिटे वेळात केली आहे.

चोरटे सराईत असण्याची शक्यता

त्‍यामुळे चोरटे सराईत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घटना सोमवारी (दि.४) मध्यरात्री दोन ते चार वाजण्याच्या सुमारास केडगाव- पारगाव रस्त्यावरील जुना टोलनाका कलानगर दापोडी परिसरात घडली आहे.

यामध्ये चोरट्यांनी पार्वती मेडिकलपासून रात्री दोन वाजून बावन्न मिनिटांनी चोऱ्यांना सुरूवात केली.

मेडिकलचे शटर उचकटून २००० रुपये, प्रसाद मेडीलचे शटरलॉक उचकटून गल्ल्यातील ३०,००० रुपये, ओमसाई मेडिकल्सचे शटर उचकटून ४५ हजार रुपये नेले आहेत.

प्रत्येक ठिकाणी साधारण पाच ते सात मिनिटांचा वेळ त्यांनी घेतला आहे. हे त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीमधून समोर आले आहे.

आदित्य किराणामधील कुलुप तोडून गल्ल्यातील ५ हजार रूपयांवर डल्‍ला.

रुपनवर मेडिकल्समधील ५ हजार रूपये चोरून नेणाऱ्या या चोरट्यांनी सृष्टी हॉटेल फोडून दोन हजार रूपयांवर डल्‍ला मारला.

यावेळी शेजारील साईराज परमीट रूमला त्यांनी शेवटचा दणका दिला. पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांनी त्‍यांनी या ठिकाणी चोरी केली.

मुख्य दाराचा कोयंडा तोडून २५ हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या आणि गल्ल्यातील २५ हजार रूपये रोख रक्‍कम लंपास केली आहे.

सर्व चोऱ्या १ तास ५२ मिनिटांत केल्या

या सर्व चोऱ्या १ तास ५२ मिनिटांत केल्या असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार त्यांचे सहकारी जे. एस. जाधव, पी. आर. गंपले, केशव वाबळे, पोलीस हवालदार बाळासाहेब गाडेकर यांनी भेट दिली आहे.

Back to top button