

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेचा तब्बल 117 कोटी 21 लाख 56 हजार 952 रुपयांचा अर्थसंकल्प नुकताच मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी सादर केला आहे. 17 लाख 75 हजार 952 रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात 83 कोटी 95 लाख 67 हजार रुपये सर्वसाधारण महसुली जमा, 32 कोटी 83 लाख 10 हजार भांडवली जमा व 42 लाख 79 हजार 952 रुपये मागील शिल्लक दाखविण्यात आली आहे. तर, 2023-24 या वर्षात 54 कोटी 53 लाख 6 हजार रुपये सर्वसाधारण महसुली खर्च, 62 कोटी 58 लाख 45 हजार रुपये भांडवली खर्च व 17 लाख 75 हजार 952 रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे.
मालमत्ता करापोटी 23 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित
नगर परिषदेला 2023-24 या वर्षात संकलित मालमत्ता करापोटी 23 कोटी रुपये, पाण्यावरील विशेष कर (पाणीपट्टी) मधून 11 कोटी 70 लाख रुपये, जाहिरात करातून 2 कोटी रुपये, ड्रेनेज करातून 48 लाख रुपये, अग्निशमन करातून 2 कोटी 20 लाख रुपये, घनकचरा व्यवस्थापन शुल्कातून 1 कोटी 20 लाख रुपये, सांडपाणी व्यवस्थापन शुल्कातून 67 लाख रुपये व इतर अन्य कर व दरातून 41 कोटी 76 लाख 82 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.
करवसुलीवर भर
सोबतच विशेष अधिनियमाखाली वृक्षकर वसुलीतून 52 लाख रुपये अपेक्षित आहे. नगर परिषदेच्या खंडाळा तलाव नौका विहार, प्रियदर्शिनी हॉल व विविध मालमत्तांमधून 26 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. बाजार फीमधून 25 लाख 20 हजार, अतिक्रमण व इतर फी मधून 17 लाख 13 हजार, कर थकबाकी व्याजातून 3 कोटी 40 लाख रुपये, टैंकर स्टैंडपासून 50 लाख रुपये, अशा विविध वसुल्यांमधून 5 कोटी 88 लाख 70 हजार रुपये अपेक्षित उत्पन्न धरण्यात आले आहे.
कर्मचार्यांचा आरोग्य विमा काढण्यात येणार
खर्चामध्ये सामान्य प्रशासनातील सेवकाचे कायम वेतन 4 कोटी रुपये, विविध साहित्य खरेदी, बिले, भत्ता, नागरी सुविधा आदी प्रशासकीय कामासाठी 6 कोटी 85 लाख 60 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे नगर परिषदेच्या सर्व कर्मचार्यांचा आरोग्य विमा काढण्यात येणार असून, त्यासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, विविध कंत्राटी कामांसाठी जे कुशल कामगार अभियंते घेतले जात आहेत. त्याच्या पगारासाठी 60 लाख रुपये व नगर परिषद इमारतीत वायफायसाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्मचारी निवृत्ती वेतनासाठी 7 कोटी 50 लाख रुपये बोनस व सानुग्रह अनुदानासाठी 60 लाख रुपये तर 7 व्या वेतन आयोगातील फरक व कालबध्द पदोन्नती. फरकासाठी 1 कोटी रुपये अशा या सामान्य प्रशासन व वसुली कामासाठी एकूण 17 कोटी 90 लाख 45 हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
दिवे देखभाल दुरुस्तीसाठी 81 लाखांची तरतूद
सार्वजनिक सुरक्षितता यामधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी व देखभाल दुरुस्तीसाठी 22 लाख रुपये, सार्वजनिक दिवे देखभाल दुरुस्तीसाठी 81 लाख रुपये, मोकाट व पिसाळलेली कुत्री पिंजरा व्यवस्था व निरुपयोगी झाडे व जलपर्णी, गाळ काढण्यासाठी 12 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य व सोयी या शीर्षकातील पाणीपुरवठा विभागअंतर्गत पाण्याच्या टाक्या साफ करणे, गळती, शुध्दीकरण, दुरुस्ती आदी कामांसाठी 6 कोटी 94 लाख 81 हजार रुपये तर भुयारी गटर योजना देखभाल व दुरुस्तीसाठी 50 लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातील कामगार पगार, साहित्य खरेदी, जंतूनाशके, वाहने देखभाल दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन, सार्व, शौचालय, गटारे साफसफाई, औषध फवारणी, कंत्राटी पद्धतीने घरोघरी कचरा गोळा करणे आदी कामांसाठी 12 कोटी 98 लाख 75 हजार रुपये तरतूद केली आहे. रुग्णालयातील कामगार पगार रुग्णवाहिका, शासकीय आरोग्य मोहिमा व जनजागृती कामासाठी 20 लाख रुपये, बाजारपेठ, कोंडावडे, पर्यटन केंद्र कामासाठी 11 लाख 15 हजार, सार्वजनिक उद्याने देखभाल दुरुस्तीसाठी 24 लाख 50 हजार, बांधकाम विभागातील कामासाठी 4 कोटी 42 लाख 52 हजार, प्राथमिक शिक्षणासाठी 89 लाख 25 हजार तर माध्यमिक शिक्षणासाठी 11 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.
शासनाकडून 26 कोटी 76 लाख अनुदान अपेक्षित
शासनाकडून मिळणारी अनुदाने व अंशदाने यामधून 26 कोटी 76 लाख रुपये अपेक्षित आहेत. यामध्ये नगरपालिका सहाय्यक अनुदान 23 कोटी 50 लाख रुपये मिळतील, असे ग्राह्य धरण्यात आले आहे. तर, मुद्रांक शुल्कातून 3 कोटी रुपये अपेक्षित आहेत. विविध वसुली व दंडाच्या रकमेतून 8 कोटी 33 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.