जेजुरी औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन व्यवस्थापन समिती स्थापन करा

जेजुरी औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन व्यवस्थापन समिती स्थापन करा

सासवड(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : जेजुरी येथील औद्योगिक वसाहतीतील दोन अपघातांची प्रशासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली? असा प्रश्न आमदार संजय जगताप यांनी विधानसभेत विचारला. भविष्यात अपघातांच्या घटना घडू नयेत, यासाठी जेजुरी औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन व्यवस्थापन समिती स्थापना करण्याची मागणीही त्यांनी केली. बर्जर पेंट कंपनीत 29 डिसेंबर 2022 रोजी स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला होता तसेच आयएसएमटी कंपनीतही काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दोन्ही अपघातांची चौकशी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून केल्याचे सांगितले.

बर्जर पेंट इंडिया लि.या कारखान्यातील अपघातग्रस्त रोहित माने यांच्या कुटुंबीयांना राज्य कामगार विमा योजनेतून नुकसानभरपाईबाबत पाठपुरावा सुरू आहे. कारखाना व्यवस्थापनाने 25 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले असून, भावास नोकरी देण्याचे मान्य केल्याचे डॉ. खाडे यांनी सांगितले. आयएसएमटी लि. कारखान्यात मोल्टन मेटलने भरलेले लँडल क्रेनच्या रोपसह जमिनीतील पीटमध्ये कोसळले. परिणामी, त्या परिसरात काम करणारे 5 कंत्राटी कामगार भाजून जखमी झाले. उपचारांनंतर ते कामावर रुजू झाले आहेत.

दोन्ही अपघातांत क्षेत्रीय सरकारी कामगार अधिकार्‍यांनी कारखाना व्यवस्थापनाविरुद्ध निरीक्षण शेरे पारीत केले आहेत. दोन्ही कारखान्यांच्या भोगवटादारांविरुद्ध अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पुणे यांच्या न्यायालयात फौजदारी खटले दाखल केले असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. औद्योगिक वसाहतीत अपघातांच्या घटना थांबविण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत कारखाने अधिनियम 1948 मध्ये तरतूद नाही. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्याचे खाडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news