पुरंदर उपसाच्या पंप दुरुस्तीला सुरुवात | पुढारी

पुरंदर उपसाच्या पंप दुरुस्तीला सुरुवात

परिंचे; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेली पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे काही पंप दुरुस्तीमुळे बंद होते. या पंपाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली. हे पंप बंद असल्याने शेतकर्‍यांना पाणी मिळण्यास अडचण येत होती. आमदार जगताप यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क करून पंप दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मेकॉनिकल डिव्हीजनने पंप दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तालुक्याच्या विकासासाठी वरदायिनी ठरला आहे. ही योजना एकूण सहा टप्प्यात आहे. साधारण 15 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या योजनेच्या पंप हाऊसमधील मोटारी, लोखंडी पाइप, व्हॉल्व्ह गंजलेल्या अवस्थेत आहेत. या नादुरूस्त पंप व व्हॉल्व्हमुळे ठिकठिकाणी पाणी गळती होत असल्याचे पाहणीत आढळून आले.

ही योजना उन्हाळ्यात सुरू असते. पावसाळा व नंतर किमान सहा महिने ही योजना बंद असते. या काळात पंपांची व जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असते. शेतकर्‍यांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार संजय जगताप यांनी तातडीने अधिकार्‍यांशी संपर्क साधून व्हॉल्व्ह, मोटार, पाइप यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिल्यानंतर हे सुरू झाले आहे. यामुळे लाभार्थी शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button