बारामती : पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला; चौघांना अटक | पुढारी

बारामती : पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला; चौघांना अटक

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील आमराई भागात पूर्ववैमनस्यातून एकावर प्राणघातक हल्ला झाला. घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, पुण्यातील ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शहर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली. चंदन गव्हाळे, तन्मय काकडे, अक्षय वाघमोडे, आकाश वाघमोडे (रा. आंबेडकर वसाहत, बारामती), आरती गव्हाळे, शंकर गव्हाळे (रा. आमराई, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

चंदन गव्हाळे, तन्मय, अक्षय व आकाश वाघमोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. 15 डिसेंबर 2022 रोजी चंदन गव्हाळेला महेश खंडागळे यांनी फायटरने मारहाण केली होती. या प्रकरणी खंडागळेंविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस पोलिस कोठडीत ठेवले होते; परंतु या कारवाईने चंदनचे समाधान झाले नाही. पोलिस कोठडीतून सुटल्यानंतरही खंडागळे हे भीतीपोटी घरी येत नव्हते. 2 मार्च रोजी ते घरी आले. सायंकाळी ते बहीण कोमल मिसाळ, मेहुणे राहुल मिसाळ, वडील सुनील, आई आशा, भाऊ विनायक यांच्यासह घरी असताना हे सहाजण तेथे आले. त्यांनी घरावर दगड-विटांनी हल्ला केला.

खंडागळे यांच्या नातेवाइकांनी त्यांना घरात लपवून ठेवले. चंदन व तन्मय यांनी धारदार हत्याराने सुनील खंडागळे यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. आशा खंडागळे, राहुल मिसाळ यांच्यावरही वार केले. घटनेत सुनील खंडागळे जागीच कोसळले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले; परंतु गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले. आशा खंडागळे व राहुल मिसाळ यांना उपचारानंतर सोडले. या प्रकरणी कोमल राहुल मिसाळ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदवून इतर आरोपींवर कारवाई करणार आहे. जखमी सुनील खंडागळे यांची शस्त्रक्रिया ससून हॉस्पिटल येथे होणार आहे. सध्या ते जबाब देण्याच्या स्थितीमध्ये नाहीत.

                                                    – सुनील महाडिक, पोलिस निरीक्षक, बारामती

 

Back to top button