पिंपरी : रस्ते अपघातांचं भयाण वास्तव समोर ! तीन दिवसांआड होतोय एकाचा मृत्यू

पिंपरी : रस्ते अपघातांचं भयाण वास्तव समोर ! तीन दिवसांआड होतोय एकाचा मृत्यू

राहुल हातोले : 

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यामध्ये दर तीन दिवसाआड एका तरुणाचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू होत आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे या अपघातात बळी पडणार्‍यांमध्ये 20 ते 35 वयोगटांतील तरुणांची संख्या जास्त असून, 2022-23 या वर्षात एकूण 102 तरुणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व शिरूर तालुक्यामध्ये सर्वाधिक अपघात घडले आहेत. शहरात होणारे अपघात हे विशेषतः एका ठरलेल्या वेळेतच घडले आहेत. यामध्ये कार्यालयात जाण्याची आणि सुटण्याच्या वेळेत अधिक अपघात घडल्याचे दिसून आले आहे.

या घटनांची विशेष दखल घेत परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आरटीओ विभागातर्फे एक समिती स्थापनकेलेआहे. त्यानुसार, अपघाताची कारणे शोधून ते अपघात कशा रितीने टाळता येतील, यावर उपाययोजना करण्यावर ही समिती भर देत आहे. या वेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, रस्ता सुरक्षा सेलचे उपायुक्त भरत कळस्कर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारींसह मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन सक्षम करणे महत्त्वाचे
सर्वाधिक दुचाकी असलेले शहर म्हणून शहराची नवीन ओळख निर्माण होत आहे. यामुळे प्रदूषणामध्ये अधिक भर पडत असून, वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. परिणामी कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत असल्याने वाहने अधिक वेगाने पळविली जातात, यामुळे अपघाताचा सामना करावा लागत आहे.

याउट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम केली गेली तर खासगी वाहने रस्त्यावर धावणार नाही. परिणामी वाहतूक कोंडीसह शहराचे होणारे प्रदुषण देखील रोखले जाईल. आणि अपघातांची संख्या घटणार आहे.

ब्लॅक स्पॉट
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्ह्यातील इतर मुख्य रस्त्यावर सुमारे 500 मीटर अंतरात सलग तीन वर्षात पाच नागरिकांचा मृत्यू किंवा गंभीर अपघात झाल्यास ते ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केले जाते.

आरटीओकडून ब्लॅक स्पॉटची विशेष पाहणी
शहरात जी ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून वाहतूक शाखेने घोषित केली आहेत. त्यांची पाहणी आरटीओकडून सतत होत असते; तसेच याबाबत जनजागृतीदेखील करण्यात येते.

अपघातावर नियंत्रणासाठी परिवहन विभागाचे आगामी कार्य
औद्यागिक शहर असल्याने कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून, प्रत्येक कर्मचार्‍यास हेल्मेट सक्तीसाठी प्रयत्न.
शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन प्रबोधन.

प्राचार्यांशी चर्चा करून, प्रत्येक विद्यार्थ्यास हेल्मेटच्या वापराबाबत प्रबोधन करून, सक्तिसाठी विशेष प्रयत्न.
शहरात हेल्मेटबाबत सक्तिऐवजी प्रबोधनावर विशेष भर दिला जाणार.

वाहन चालकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे, त्यामुळे अपघात कमी होतील. आपल्या देशाच्या युवा पिढीचे नुकसान टळणार. अपघातांमध्ये घरातील कर्ते पुरूष बळी जात आहेत. याबाबत सर्वांनी विशेष दक्षता घेऊन आपले वाहन चालवावे.
-मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड शहर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news