पुणे : राज्यात साखर उत्पादन 20 लाख टनांनी घटणार | पुढारी

पुणे : राज्यात साखर उत्पादन 20 लाख टनांनी घटणार

किशोर बरकाले

पुणे : राज्यात चालू वर्ष 2022-23 या ऊस हंगाम हंगामात अपेक्षित सुमारे 138 लाख टनाइतके उच्चांकी साखर उत्पादन हाती येणार नसून 116 ते 120 लाख टन उत्पादन हाती येण्याचा सुधारित अंदाज साखर आयुक्तालयाकडून वर्तविण्यात आला आहे. उसाची घटलेली हेक्टरी उत्पादकता आणि इथेनॉलकडे साखर वळविण्याचा एकत्रित परिणाम म्हणून सुमारे 20 लाख टनांनी साखर उत्पादन कमी येण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यंदाच्या ऊस गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत सुरुवातीस सुमारे 1 हजार 343 लाख टन ऊस गाळप आणि 138 लाख टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. तसेच इथेनॉलकडे अधिकाधिक साखर वळविण्यामुळे 12 लाख टन साखर कमी होणार आहे. म्हणजेच एकूण 150 लाख टन साखर उत्पादन दोन्ही मिळून अपेक्षित होते.

साखर आयुक्तालयाने याबाबत साखर कारखान्यांच्या दोन आढावा बैठका घेतल्या असता नवीन आकडेवारीनुसार सुमारे 100 लाख टनांनी ऊस गाळप कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार 1 हजार 237 लाख टनाइतके एकूण ऊस गाळप आणि सुमारे 116 ते 120 लाख टन साखर उत्पादन हाती येईल. सद्य:स्थितीत राज्यात 970 लाख टन ऊस गाळपातून 9.92 टक्के उतार्‍यानुसार तब्बल 96 लाख टन साखर उत्पादन तयार झाल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी दिली.

ते म्हणाले, चालू हंगामात नव्याने ऊस लागवडीपेक्षा खोडवा उसाचे क्षेत्र जास्त म्हणजे सुमारे 55 टक्क्यांपर्यंत आहे. तसेच चालू हंगामामध्ये आडसाली उसाचे क्षेत्र कमी असल्याने उसाची तोडणी वेळेपूर्वी होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी ऊस 11 ते 12 महिन्यांमध्येच तुटला जात असल्यानेही ऊस उत्पादकतेत हेक्टरी 15 ते 20 टनांनी घट आल्याचे समोर येत आहे.

अतिवृष्टीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाऊस वेळेत न पडल्यामुळे हेक्टरी ऊस उत्पादकता घटलेली आहे. तसेच कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस क्षेत्राची आंतरमशागत म्हणजेच खुरपणी, मोळी बांधणी, खते टाकण्यास अडचणी येऊन शेतकर्‍याना वेळेत ऊस क्षेत्राची मशागत करता न आल्याचा परिणामही ऊस उत्पादकता घटण्यावर झाल्याचे शेळके यांनी सांगितले.

राज्यात हवामानातील बदलामुळे ऊस उत्पादनात हेक्टरी 20 ते 30 टक्क्यांनी घट आली आहे. त्यामध्ये मे आणि जून या महिन्यात पाऊस कमी झाला आणि जुलैनंतर सुरू झालेला पाऊस अधिक दिवस कायम राहिला. सततचा पाऊस आणि खोडवा उसाचे प्रमाण अधिक असल्याने उसाचे हेक्टरी उत्पादन 105 टनांवरून घटून 85 टनापेक्षा खाली आल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून आता 138 लाख टनाऐवजी 116 ते 120 लाख टन साखर उत्पादन हाती येईल. तर इथेनॉलकडे साखर वळविण्यामुळे 16 लाख टन साखर उत्पादन कमी होईल.
                                                         – शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

Back to top button