पेठ : उन्हाने कैर्‍या गळणे सुरू; आंबा पिकास धोका | पुढारी

पेठ : उन्हाने कैर्‍या गळणे सुरू; आंबा पिकास धोका

पेठ(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार भागात कडक उन्हाळ्याने शेतकर्‍याच्या आंबा पिकास धोका निर्माण झाला आहे. अनेक कैर्‍या न वाढता त्या गळत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे. सातगाव पठार भागात कुरवंडी, भावडी, थुगाव, कारेगाव आदी भागांत अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतात आंब्याची झाडे आहेत. कलमी झाडे असल्याने त्यांना खूप कैर्‍या आल्या आहेत.

सरासरी अर्धवट वाढलेल्या कैर्‍या कोमेजून जात आहेत, तर रोज 30 ते 40 कैर्‍या अतिउष्णतेने खाली पडत आहेत. यासह अचानक येणार्‍या वार्‍याने आंब्याचे झाडे हेलावत असून, अन्य कैर्‍यादेखील खाली पडत आहेत. आंबे झाडाला शेवटपर्यंत राहतात की नाही, अशी भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. आंबा उत्पादक शेतकरी वसंतराव एरंडे, प्रकाश कुदळे व ज्ञानेश्वर माउली एरंडे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. आता तर राज्यात वादळी-वार्‍यासह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पाऊस झाला तर कैर्‍या राहतील की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

Back to top button