‘हू इज धंगेकर ?’ विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची कसब्यातील पराभवानंतरची प्रतिक्रिया चर्चेत | पुढारी

‘हू इज धंगेकर ?’ विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची कसब्यातील पराभवानंतरची प्रतिक्रिया चर्चेत

पुढारी डिजीटल : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला असला तरी नेते आणि पक्षांमधील टशन काही संपताना दिसत नाही. प्रचारादरम्यान केलेल्या आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद अजूनही उमटत आहेत. भाजपाच्या काही नेत्यांनी मात्र यावर शांत राहणंच पसंत केलं आहे. चंद्रकांत पाटील देखील या निवडणुकीतील काही मुदद्यांवर मौन बाळगून आहेत. निवडणुकीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी ‘हू इज धंगेकर ? तो आमच्यासमोर टिकणार नाही’ असं विधान प्रचारसभेदरम्यान केलं होतं.

यावर चिडलेल्या धंगेकर समर्थकांनी विजयानंतर ‘धंगेकर इज नाऊ एमएलए’ असे पोस्टर बऱ्याच ठिकाणी लावले. या सगळ्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी मात्र या विषयावर बोलणं टाळलं. चंद्रकांत पाटील चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते.  यावेळी त्यांनी अश्विनी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूरमध्येही धंगेकरांची हवा !

धंगेकरांच्या विजयाची हवा कोल्हापुरातही होते आहे. या होर्डिंगवर ‘धीस इज धंगेकर’ म्हणत चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला उत्तर दिल्याचं बोललं जात आहे. एरवी सगळ्यांवर थेट करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं या प्रकरणावर असलेलं मौन मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Back to top button