

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील वेठेकरपट येथे असणाऱ्या गणेश राणू जाधव यांच्या विहिरीत शनिवारी (दि. ४) बिबट्या दिसून आला. या बिबट्याला स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने वनविभागाने सुखरुप बाहेर काढले. सकाळी ७ वाजेच्या सुमारास विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती बाबाजी खर्गे या शेतकऱ्याला समजताच त्यांनी एक लाकडी झोपाळा तयार करून दोरीच्या साहाय्याने विहिरीत सोडला.
पाण्यात असणारा व पोहून दमलेला बिबट्या त्यावर सुखरूप बसला. त्यांनतर ही घटना तात्काळ वनविभागाला कळविण्यात आली. लागलीच ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आळे वनविभागाचे वनपाल व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले व रेस्क्यु टीमच्या सहाय्याने त्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. प्रथमोपचारासाठी या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात केली असल्याची माहिती वनपाल संतोष साळुंखे यांनी दिली.
या बिबट्याचे अंदाजे वय एक ते दीड वर्षं असून हा नर जातीचा बिबट्या शिकारीच्या शोधात असताना रात्रीच्या वेळी कठडा नसलेल्या विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संतोष साळुंखे, बाबाजी खरगे, भिवाजी खरगे यांनी रेस्क्यु करून बिबट्याला सुखरूप बाहेर काढले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सावणे यांनी त्याची तपासणी करून बिबट निवारण केंद्र माणिकडोह येथे त्याला सोडले आहे.
भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडल्याची शक्यता
जुन्नर तालुका खरतर बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून मानला जातो. तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचबरोबर सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने निवारा मिळवण्यासाठी बिबटे सैरभैर धावताना व रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडण्याचे प्रमाण सध्या वाढताना दिसून येत आहे.