पिंपरी : माता-नवजात बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश | पुढारी

पिंपरी : माता-नवजात बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश

पिंपरी : पुढारी वृत्तसेेवा : आठ महिन्यांची गरोदर माता आणि तिच्या नवजात बाळाला वाचविण्यात नवीन थेरगाव रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले, त्यामुळे त्यांना नवसंजीवनीच मिळाली. संबंधित महिला रुग्णालयामध्ये उपचारासाठी आली होती. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच, ती अत्यवस्थ होती. तिचा हृदयविकाराने मृत्यू होण्याची दाट शक्यता होती. तिच्यासह बाळाचाही मृत्यू होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे कमीत कमी वेळेत तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर होती.

सुरुवातीला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर डॉक्टरांना त्यांचे प्रयत्न सार्थकी लागल्याचे समाधान वाटले. मात्र, त्यानंतर त्यांच्यासमोर दुसरे आव्हान होते ते मातेचाही जीव वाचविण्याचे. डॉक्टरांच्या अथक परिश्रमातून पुढील काही तासांनी मातेचीही हालचाल सुरू झाली. त्यामुळे अखेर माता आणि बाळ अशा दोघांनाही वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. फिजिशियन डॉ. कृष्णा व त्यांचे सहकारी, थेरगाव रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, भूलतज्ञ डॉ. नेहा पाटील तसेच, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. संदीप पाटील (रुबी अलकेअर) यांच्या समन्वयाने डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी उपचार केले. महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांचे त्यासाठी मार्गदर्शन लाभले. बालरोगतज्ञ डॉ. अश्विनी कराळे व त्यांचे सहकारी, शस्त्रक्रिया विभागाचे कर्मचारी आदींचे
सहकार्य लाभले.

Back to top button