पिंपरी : ‘त्यांच्या’ हाताने नारळ फोडा, पण विकासकामे थांबवू नका ! : आमदार सुनील शेळके | पुढारी

पिंपरी : ‘त्यांच्या’ हाताने नारळ फोडा, पण विकासकामे थांबवू नका ! : आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ : राज्य सरकारने स्थगिती दिल्याने मावळ तालुक्यातील रखडलेल्या विकासकामांसंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक भूमिका घेऊन हवं तर ‘त्यांच्या’ हाताने नारळ फोडा, पण विकासकामे थांबवू नका, अशी मागणी केली. आमदार शेळके यांनी या वेळी बोलताना प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या इंद्रायणी नदीवरील वराळे-आंबी रोडवरील रखडलेला पूल, कुंडमळा, कोथुर्णे येथील पुलाची कामे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून निधीअभावी रखडली असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

विकासकामांवरील स्थगिती उठवा
सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले कान्हे येथील सुरू असलेले उपजिल्हा रुग्णालयाचे कामही रखडले आहे, तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. लोणावळा पोलिस ठाणे व पोलिस वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरी अजूनही तालुक्यातील काही आदिवासी गावांमध्ये लाईट नाही, त्यासाठी निधीची मागणी केली तीही मिळत नाही. त्यामुळे तुमचा नाही निदान महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिलेला निधी तरी द्या, हवं तर त्यांच्या हाताने नारळ फोडा पण मंजूर असलेल्या विकासकामांवरील स्थगिती उठवा, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.

शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन रिंगरोड करा
पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या माध्यमातून प्रस्तावित असलेला रिंगरोड प्रकल्प करताना तो शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच करावा, समृद्धी महामार्गप्रमाणे बाधित शेतकर्‍यांना पाच पट दर द्या व शेतकर्‍यांना न्याय द्या अन्यथा, वेगळे वळण लागू शकते, असा इशाराही आमदार शेळके यांनी या वेळी दिला.

Back to top button