कल्याण-अहमदनगर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा ! | पुढारी

कल्याण-अहमदनगर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा !

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग चांगला चकचकीत झाल्याने वाहनांच्या वाढलेल्या वेगामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या वर्षात जवळपास 25 जणांना या महामार्गावरील अपघातात आपला जीव गमवावा लागलेला आहे, तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. पेमदरा ते दांगटवाडी दरम्यान तीस किलोमीटरच्या अंतरात 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत 150 अपघात झाले आहेत. यामध्ये चाळीस गंभीर स्वरूपाचे अपघात झाले. दुखापतीशिवाय पाच अपघात झाले आहेत.

यात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यात पुरुष व महिलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 25 जण गंभीर जखमी झाले असून, यात वीस पुरुष व पाच स्त्रियांचा समावेश आहे. चार ते पाच किरकोळ अपघात झाले असून, यात पाच पुरुष व तीन महिला जखमी झाल्या आहेत. 1 जानेवारी ते 1 मेपर्यंत पंधरा अपघात झाले असून, त्यात दहा जण ठार झाले आहेत. गुंळूचवाडी येथे मोटारसायकलचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला आहे. एक महिन्यापूर्वी बेल्हे शिवारात सकाळी हायवा ट्रक आणि टेम्पोच्या अपघातात टेम्पोचालक ठार झाला.

आणे घाट उतरून येणार्‍या वाहनांचा वेग जास्त असतो. गुळूंचवाडीजवळ मोठ्या प्रमाणात गतिरोधक आणि रस्त्याला खड्डे पडल्याने 44 अपघात झाले होते. खड्डे बुजविले गेलेले असले तरी वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही. वाहनांच्या प्रचंड वेगामुळे बांगरवाडीतील समर्थ महाविद्यालयाजवळ दोन्ही बाजूंनी उतार असून, समोरून येणारी वाहने जवळ आल्याशिवाय दिसत नाही, त्यामुळे अपघात जास्त होतात. महाविद्यालयाजवळ गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग कमी होत नाही. येथेही अपघात मोठ्या प्रमाणात होतात.

बेल्हे बाह्यवळणाजवळ धोकादायक वळण आहे. येथे शाळा जवळच असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. गतिरोधक असल्याने वाहनांचा वेग कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती, मात्र अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अणे येथील सरदार पटेल हायस्कूलजवळ शालेय विध्यार्थ्यांना अपघात झाल्याने महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण कमी झाले असल्याचे बोलले जाते. राजुरी येथे गणेश सहकारी दूध संस्थेच्या मुख्य दरवाजाजवळ, राजुरी गावची स्मशानभूमी ही महामार्गालगत असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात.

वाहनचालकांनी धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नये. रस्त्यात कुठेही वाहने उभी करू नयेत. गाडीच्या वेगावर नियंत्रण असावे. चारचाकी वाहनचालकांनी व प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर करावा. दुचाकीस्वरांनी हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून वाहन चालवू नये, नियमाचे पालन न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

                                     – यशवंत नलावडे, पोलिस निरीक्षक, आळेफाटा

मोबाईच्या वापराने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली पाहिजे. आपल्या वाहनांच्या वेगावर मर्यादा असावी. वाहनचालकांनी रस्तासुरक्षा नियमांचे नीट पालन केल्यास अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

                                  -मारुती गुंजाळ, संस्थापक, श्रीपाद वल्लभ पतसंस्था

 

Back to top button