बारामती : कांद्याला 3 हजार रुपये हमीभाव द्या | पुढारी

बारामती : कांद्याला 3 हजार रुपये हमीभाव द्या

बारामती; पुढारी वृत्तसेवा : कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी अधिकच कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. त्यासाठी शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे करण्यात आली. यासंबंधीचे निवेदन पक्षातर्फे तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अमोल सातकर, बारामती लोकसभा अध्यक्ष अरविंद देवकाते, काकासाहेब बुरुंगले, सोशल मीडिया प्रमुख शैलेश थोरात, दादासाहेब भिसे, स्वप्नील जगताप, अरुण लोहार, रेवण कोकरे, विजय मोटे, निखिल दांगडे, श्याम घाडगे, वैभव पाटील, शिवाजी थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अ‍ॅड. सातकर म्हणाले, की या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक चांगली आहे. परंतु, दुर्दैवाने शेतकर्‍यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. शेतकर्‍यांना कांदा पिकविण्यासाठी प्रतिक्विंटल एक हजार ते बाराशे रुपये खर्च येत आहे.

बाजारात सध्या 500 ते 600 रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होताना दिसत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकर्‍यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल किमान 3000 रुपये हमीभाव देण्यात यावा. टाकाऊ, भंगार वस्तूची किंमतसुद्धा कांद्यापेक्षा चांगली मिळते. शेतकर्‍याला एवढा कमी दर मिळाला, तर त्याने जगायचे कसे, असा सवाल संदीप चोपडे यांनी केला.

Back to top button