पिंपरी : लोकप्रियता घटली ? गत निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांत घट | पुढारी

पिंपरी : लोकप्रियता घटली ? गत निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांत घट

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी 1 लाख 35 हजार 603 मते घेत 36 हजार 168 मताधिक्याने विजय मिळविला. गेल्या 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतात 15 हजार 120 ने घट झाली आहे.
ऑक्टोबर सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी 1 लाख 50 हजार 723 मते घेतली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा 38 हजार 498 मतांनी पराभव केला. कलाटे यांना 1 लाख 12 हजार 225 मते मिळाली होती.

आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला आपली सर्व मते राखण्यास यश मिळालेले नाही. पोटनिवडणुकीत 1 लाख 35 हजार 603 मते मिळाली. त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचा 36 हजार 168 मतांनी पराभव केला. काटे यांना दुसर्‍या क्रमाकांची 99 हजार 435 मते मिळाली. मागच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांतील 15 हजार 120 मते कोठे गेली, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मात्र, दोन्ही वेळेच्या विजयातील मताधिक्यात 2 हजारांचा फरक आहे.

Back to top button