

बारामती : पुण्यातील पोटनिवडणूकीसह अन्य ठिकाणची स्थिती पाहिली तर देशात बदलाचे वारे दिसते आहे,त्याचे परिणाम आगामी निवडणूकीत बघायला मिळतील अशी आशा असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, पुण्यातील कसबा मतदारसंघातील मतांची माहिती घेतली तर भाजपला फक्त दोन ठिकाणी अधिकची मते मिळाली आहेत. हा बदल पुण्यासारख्या ठिकाणी होतो आहे, लोक वेगळा विचार करत आहेत.
देशातही बदलाचा मूड तयार होतो आहे. पुण्याच्या निवडणूकीने ते दाखवून दिले. मागील काही निवडणूकांत भाजपला एखाद दुसरी जागा वगळता फार यश आलेले नाही. कसबा हा तर त्यांचा बालेकिल्ला होता. सरकार त्यांचे, सत्तेचा ते पूर्ण वापर करत असतानाही त्यांना यश येत नाही. आत्ता राज्यासह देशात जे काही निकाल येत आहेत. ही स्थिती बदलाला अनुकुल आहे. देशाची स्थिती बघितली तर केरळ, तामिळनाडूमध्ये भाजप नाही, तेथे ते येतील अशी शक्यताही नाही. कर्नाटकमध्ये काॅंग्रेसचे राज्य होते.
परंतु खासदार, आमदार फोडून भाजपने सत्ता आणली. तेथे उद्याच्या निवडणूकीत लोक या निर्णयासंबंधीचा विचार नक्की करतील. आंध्र, तेलंगण, पंजाब, दिल्ली, हिमाचल आदी ठिकाणी भाजप नाही. हे जे चित्र दिसतेय ते देशात एक प्रकारे बदलाचे वारे सुचित करत आहे. त्याचे परिणाम आगामी निवडणूकीत बघायला मिळतील ही आशा आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेचे पवार यांनी स्वागत केले. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करताना आता सरन्यायाधिश, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि अन्य सदस्य निर्णय प्रक्रियेत असतील. संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने हा चांगला निर्णय आहे.
नागालॅंडमध्ये चांगले यश
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. तेथे आम्ही १२ जागा लढवत सात ठिकाणी विजय मिळविला. क्रमांक दोनचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पुढे आला. तेथे सत्ताधारी पक्षाचे सरकार बनेल. परंतु मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे नेतृत्व राष्ट्रवादी करेल. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी नरेंद्र वर्मा हे नागालॅंडला जात आहेत. ते तेथे सगळ्यांशी विचारविनियम करून काय करावे हे मला कळवतील, त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेवू. तेथे मतांची टक्केवारी चांगली मिळाली. त्यामुळे नागालॅंडच्या जनतेचे आम्ही आभारी आहोत, असे पवार म्हणाले.
गुंतवणूकदारांसाठी योग्य वातावरण हवे
अँपल फोनचा ३०० एकरावरील प्रकल्प कर्नाटकात जात असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, देशात कुठेही असे प्रकल्प होत असतील तर आनंद आहे. कर्नाटक काही पाकिस्तान नाही. मुद्दा एकच आहे की, हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याचा विचार होता, तो का बदलला. याचा विचार सरकारने केला पाहिजे. महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांना योग्य वाटते, याचा अर्थ आमची काही तरी कमतरता आहे, ती दुरुस्त केली पाहिजे, असे पवार म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकार काही करत नाही
राज्यात कांद्याला भाव नाही. कोबीची तीच अवस्था आहे. मी नुकताच नगर, नाशिक दौरा केला. तेथे अनेक शेतकरी भेटले. त्यांनी मला कांदा फेकून दिल्याचे सांगितले. ही परिस्थिती अतिशय वाईट आहे. केंद्र व राज्य सरकार यासंबंधी निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असताना कांद्याच्या दराचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु तो आम्ही खरेदी केला, काही नाफेडला खरेदी करायला लावला. आर्थिक बोजा उचलला. परंतु सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार या विषयात लक्ष घालत नाही. फक्त करतो करतो असे आश्वासन देत आहेत. परंतु अजून काहीही केले नाही, असे पवार म्हणाले.