निमोणे : बँका सर्वसामान्यांना आणत आहेत रस्त्यावर

निमोणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्जदारांचे हप्ते थकल्यामुळे विविध बँकांनी त्यांच्या मालमत्तेवर टाच आणून त्यांच्या वारसांना अक्षरशः रस्त्यावर आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. साहेब हा अतिशय गंभीर प्रश्न असून, आपण यामध्ये लक्ष घालून मार्ग काढा, अशी साद राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उद्योग व व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सुभाष गव्हाणे यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना घातली.
शरद पवार यांनी गव्हाणे यांचे निवेदन स्वीकारून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. उद्योग आणि व्यापारी घटकांच्या समोर अनंत अडचणी आहेत. या वर्गामध्ये झोकून काम करा. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू, असा शब्द पवारांनी या वेळी दिला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही छोट्या समाजातून आलेले सुभाष गव्हाणे यांच्या पाठीवर हात टाकून वंचितांच्या व्यथा जाणा यातूनच कार्यकर्ता घडतो, हा कानमंत्रदेखील पवार यांनी या वेळी दिला.